|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दाखल गुन्हय़ांच्या तपासाचा आलेख उंचावतोय

दाखल गुन्हय़ांच्या तपासाचा आलेख उंचावतोय 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हय़ातील सन 2016 मध्ये घडलेल्या गुन्हय़ांची उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. कायदा सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभाग अथक परिश्रम घेत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरात घडलेल्या गंभीर ते किरकोळ स्वरूपाचे गुन्हय़ांची उकल करण्यात पेलीस यंत्रणेने उत्तम कामगिरी केलेली आहे. ही कामगिरी आणखीन 50 टक्क्यांपर्यंत सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सन 2016 मध्ये जिल्हा पोलीस दलाकडे दाखल व उघड गुन्हय़ांबाबतची माहिती व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या नवीन योजनांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी गुन्हय़ांबाबतची माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एल.पाटील हे देखील उपस्थित होते. मागील सरत्या वर्षात 14 खून घडले त्यापैकी 13 खुनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आहे. खुनाचा प्रयत्न करणे 15, सदोष मनुष्यवध 3, गर्दी मारामारी 98, दुखापती करणे 166, दरोडा 5 अशा दाखल सर्व गुन्हय़ाची उकल करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात महिलांवर 45 बलात्काराच्या घटना घडल्या असून त्यापैकी 44 घटनांचा छडा लावून पोलिसांनी आरोपींना अटक केली. विनयभंगा 86 पैकी 85 गुन्हे तपासात यशस्वी करण्यात आले आहेत. चोऱयांच्या प्रमाण जरी वाढलेले असले तरी त्यांच्या तपासातही पोलिसांना यश आलेले आहे. जबरी चोरीचे 31 गुन्हे घडले त्यापैकी 22 गुन्हे प्रकाशपटलावर आणण्यात आले. या घटनांत चोरीस गेलेल्या 16 लाख 52 हजार 800 इतक्या ऐवजापैकी गुन्हय़ांच्या तपासातून 4 लाख 90 हजाराचा माल हस्तगत करण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली आहे.

घरफोडीच्या 115 घडलेल्या घटनांपैकी 49 घटना उजेडात आणण्यात आल्या. या घरफोडय़ांमध्ये 76 लाख 64 हजार 812 रु.चा एकूण ऐवज लंपास करण्यात आला. त्यापैकी सुमारे 24 लाख 71 हजाराचा ऐवज चोरटय़ांकडून हस्तगत करण्यात आला आहे. किरकोळ चोरीच्याही घटनांनी डोके वर काढले होते. गेल्या वर्षभरात 403 चोरीच्या घटनांचे गुन्हे विविध पोलीसस्थानकात दाखल करण्यात आले. त्यापैकी 130 चोऱयांचा छडा लागला. यामध्ये चोरीस गेलेल्या सुमारे 3 कोटी 12 लाख 94 हजाराच्या ऐवजापैकी 1 कोटी 14 लाख 94 हजाराचा ऐवज हस्तगत करण्याची कामगिरी तपास करणाऱया पोलीस कर्मचाऱयांनी पार पाडलेली आहे. तसेच गेल्या वर्षभरात अतिमहत्वांचे व्यक्तींचे दौरे व आंदोलने, ग्रामपंचायत, नगर परिषदांच्या निवडणूकाही शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी कामगिरी बजावली असल्याचे प्रणय अशोक यांनी सांगितले.

पोलीस विभागाने राबविलेल्या योजना

गेल्या वर्षभरात पोलीस कर्मचाऱयांच्या तक्रारींचे निवारणासाठी समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. पासपोर्ट विभागाचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे अत्याधुनिकरण करण्यात आले. अलिकडील काळात देशातील अतिरेकी कारवाया लक्षात घेता समाजातील मुलतत्ववाद निर्मुलनासाठी तसेच जातीय सलोखा वृध्दींगत करण्यासाठी हिंदू-मुस्लिम संमिश्र गावांमध्ये तज्ञ व्यक्तींची जनजागृतीपर व्याख्यानमाला, युवकांचे प्रबोधन करण्यासाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे उपविभाग व जिल्हा, शालेय व खुला गटस्तरावर आयोजन केले जात असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी सांगितले.

Related posts: