|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिनीमंत्रालयाला ‘रोहयो’चा विसर

मिनीमंत्रालयाला ‘रोहयो’चा विसर 

गणेश गुंडमी / सोलापूर

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जिल्हय़ाच्या मीनी मंत्रालयासह ग्रामपंचायतींना विसर पडला आहे. या योजनेच्या माध्यमातून कोटय़ावधी रूपयाचा निधी उपलब्ध असतानाही जिल्हय़ातील 11 तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केवळ सहा कामे सुरू असून या कामावर 27 मजूर उपस्थित असल्याची बाब समोर आली आहे.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना गावातील विकास कामे करण्याची संधी प्राप्त झाली आहे. शिवाय, गावातील रोजंदार कामगारांच्या हाताला कामही मिळवून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून गावातील पाणंद रस्ते, गावठाणमधील रस्त्यांचे मुरमीकरण, रोपवाटीका, वृक्ष लागवड, नवीन विहीरीची खुदाई, जुन्या विहीरीचे पुर्नभरण आणि विशेष म्हणजे शौचालयाची कामे करता येतात. ही कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करता येण्यासारखी आहेत. विशेष म्हणजे या योजनेला निधीही प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. पण, जिल्हय़ातील ग्रामपंचायतीनी या महत्वपूर्ण योजनेकडे पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. शिवाय, या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. पण, या विभागानेही या योजनेकडे कानाडोळा केला आहे.

जिल्हय़ातील 11 तालुक्यात एक हजार 29 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पण,  आज रोजी माळशिरस, मंगळवेढा आणि मोहळ या तीन तालुक्यात प्रत्येकी दोन या प्रमाणे सहा केवळ सहा कामे सुरू असून या कामावर केवळ 27 मजूर कार्यरत आहेत. माळशिरस तालुक्यात शौचालय बांधकामाची दोन कामे सुरू असून सहा मजूर कार्यरत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील विहीर पर्नभरणच्या दोन कामावर कामावर 12 मजूर कार्यरत आहेत तर पंढरपूर तालुक्यात वृक्ष लागवड आणि शाळेच्या मैदानाचे सपाटीकरण अशा दोन कामावर नऊ मजूर कार्यरत आहेत. उर्वरीत अक्कलकोट, बार्शी, करमळा, माढा, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातून एकही या योजनेतून काम सुरू नसल्याची बाबही समोर आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी ते गुंडमॉर्निग पथकातून सहभागी होण्याबरोबरच अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेऊन     प्रबोधणे सुरू केली आहेत. रोहयोच्या माध्यमातून शौचालयाची कामे करून जिल्हा हागणदारीमुक्त करता येणे शक्य आहे. पण, जिल्हा परिषद आणि त्यातंर्गत येणाऱया ग्रामपंचायतीनी मात्र या चांगल्या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनेतून गावातील गावठाणातील रस्ते, पाणंद रस्ते, याशिवाय गावातील विहीरींचे पुर्नभरण आणि गाळ काढण्याची कामेही करता आली असती. पण, जिल्हय़ातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची संख्या पहाता जिल्हा परिषद आणि त्यातंर्गत येणाऱया ग्रामपंचायतींनी मात्र या कामाकडे पुर्णता दुर्लक्षच केले असल्याचे समोर आले आहे.

Related posts: