|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म.गो. सत्तेवर आल्यास गोव्याचे नंदनवन बनवू

म.गो. सत्तेवर आल्यास गोव्याचे नंदनवन बनवू 

प्रतिनिधी/ फोंडा

येणाऱया विधानसभा निवडणुकीत गोव्यातील 24 मतदार संघातून म. गो. आपले उमेदवार उभे करणार आहे. गोमंतकीय जनतेचे म. गो. व मित्र पक्षाला पूर्ण बहुमताने सत्तेवर आणल्यास गोव्याचे नंदनवन करु, अशी घोषणा म. गो. पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी कुर्टी-फोंडा येथील प्रचार सभेत केली. शुक्रवारी येथील सावित्री सभागृहात ही सभा घेण्यात आली.

व्यासपीठावर फोंडय़ाचे आमदार लवू मामलेदार, कुर्टी-खांडेपारच्या सरपंच सुप्रिया गावडे, पंचसदस्य दीपा शंकर नाईक, नावेद तहसिलदार, कार्यकर्ते गौरव कुडचडकर, अजय बुवा, अनिल नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, सुमित वेरेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मागील निवडणुकीत फोंडा तालुक्यातील तीन मतदार संघातून म. गो. पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. यंदा तालुक्यातील चारही मतदार संघातून म. गो.ला विजय प्राप्त करुन देण्यासाठी जनतेने पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी पुढे बोलताना केले. कुळ-मुंडकार प्रश्नावर माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. कारण कुळ मुंडकारांच्या नावे लाखो चौ. मिटर जमिन त्यांनी स्वत:च्या नावावर लाटल्याचा आरोपही सुदिन ढवळीकर यांनी यावेळी केला.

सुदिन ढवळीकर हे आगामी मुख्यमंत्री : लवू मामलेदार

फोंडा मतदार संघ व तालुक्याचा खऱया अर्थाने विकास म. गो. पक्षामुळेच झाला असून सुदिन ढवळीकर यांनी आपल्या बांधकाम खात्यातून आजवर बाराशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत, असे आमदार लवू मामलेदार म्हणाले. भाजपा सरकारच्या कार्यकाळात बहुजन समाजाची उपेक्षा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. फोंडय़ातील महत्त्वाचे प्रकल्पांना विलंब होण्यास व ते रखडण्यास भाजपाच कारणीभूत असल्याचे सांगून यापुढे गोव्यातील प्रादेशिक पक्ष म्हणून म. गो. लाच बहुमताने सत्तेवर आणून सुदिन ढवळीकरांना आगामी मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मतदान यंत्रातून सिंह गायब

  कवळे पंचायत क्षेत्रात इलेक्ट्रोनिक मतदान यंत्राची प्रात्यक्षिके दाखविण्यास आलेल्या यंत्रणेमध्ये सिंह हे चिन्ह गायब झाल्याचा आरोप राजेश कवळेकर यांनी केला. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दामहून हा घोळ घालण्यात आल्याचे ते म्हणाले. मतदारांनी ऍक्झिट पोलसारख्या फसव्या प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन गौरव कुडचडकर यांनी केले. अजय बुवा, चरणजित सप्रे, दीपा नाईक, सुमित वेरेकर, नावेद तहसिलदार, सरिता परब यांची यावेळी भाषणे झाली.

भरारी पथक आल्याने सभेला उशिर

  म. गो. पक्षाच्या या सभास्थळी अचानकपणे भरारी पथक दाखल झाल्याने गोंधळ उडाला. सभेसाठी आवश्यक परवानगी घेतल्याचे लेखी पत्राची मागणी या पथकाकडून करण्यात आली. सभेसाठी परवानगी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेण्यात आली होती. त्यामुळे सभा घेण्यास प्रथम हरकत घेण्यात आली. नंतर निवडणुक आयोगाच्या वरिष्ठांशी चर्चा करुन काही अटींवर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली. तोपर्यंत सभेला तासभर उशिर झाला होता.

Related posts: