|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » निवडणुकपूर्व युतीसाठी गोवा फॉरवर्डचे प्रयत्न

निवडणुकपूर्व युतीसाठी गोवा फॉरवर्डचे प्रयत्न 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात महागठबंधन करून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने 15 जानेवारीपर्यंत युतीबाबत संयम पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र युती न झाल्यास 16 जानेवारीला गोवा फॉरवर्डचे उमेदवार आपली उमेदवारी दाखल करतील. 16 रोजी जनमत कौल दिन असल्याने त्या मुहुर्तावर गोवा फॉरवर्डचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील.

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, युगोडेपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची निवडणुकपूर्व युती व्हावी यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीत नुकतीच युतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चाही झाली आहे. गोवा फॉरवर्ड  आणि युगोडेपाबरोबर युती करण्यास काँग्रेस नेत्यांनी अनुकुलता दाखविली आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निर्णय घेण्यात आलेला नाही. युगोडेपासाठी दोन जागा सोडण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. गोवा फॉरवर्डने किमान चार जागांसाठी दावेदारी केली आहे.

फातोर्डा, साळगाव आणि शिवोली हे तीन मतदारसंघ गोवा फॉरवर्डसाठी सोडण्यास काही प्रमाणात काँग्रेस अनुकूल आहे. मात्र वेळ्ळी मतदरासंघावर गोवा फॉरवर्डने दावेदारी करू नये, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गोवा फॉरवर्ड यावेळी युतीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने समविचारी घटकाना बरोबर घेऊन निवडणूक लढवावी, असे गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई व युगोडेपाचे बाबुश मोन्सेरात यांना वाटते.

काँग्रेस 10 ते 12 जानेवारीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. गोवा फॉरवर्डने 15 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. काँग्रसने पूर्ण विचार करून युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असे गोवा फॉरवर्डचे म्हणणे आहे. काँग्रेसने युतीच्या मुद्यावर भर न देता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास गोवा फॉरवर्डचे उमेदवार 16 रोजी उमेदवारी दाखल करतील.

मात्र युतीबाबत काँग्रेसने पुढाकार घेतल्यास युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी गोवा फॉरवर्डने ठेवली आहे. भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी काँग्रेसने युतीच्या मुद्यावर लक्ष द्यायला हवे. मतभेद बाजूला ठेऊन गोव्याच्या हितासाठी आणि चांगल्या भवितव्यासाठी काँग्रेसने युतीवर भर द्यावा, असेही गोवा फॉरवर्ड नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: