|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर

भाजपच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर 

प्रतिनिधी/ पणजी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काल शुक्रवारी जाहीर केली असून 21 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र सध्या भाजपचेच आमदार असलेल्या सावर्डे, मये, पेडणे, काणकोण मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या माविन गुदिन्हो यांचा यादीत समावेश असला तरी कुंभारजुवेहून भाजपात आलेल्या पांडुरंग मडकईकर यांच्या नावाचा समावेश नाही. भाजपचे बहुतेक विद्यमान आमदार-मंत्र्यांचा या उमेदवार यादीत समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीला पाठवून या नावांना मान्यता घेण्यात येणार आहे.

यादीत 21 पैकी 17 विद्यमान आमदार

घोषित करण्यात आलेल्या 21 उमेदवारांपैकी 17 उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. डिचोलीचे उमेदवार राजेश पाटणेकर व फातोर्डाचे उमेदवार दामू नाईक हे माजी आमदार आहेत. कुडतरीचे उमेदवार आर्थुर डिसिल्वा यांना भाजपने प्रथमच उमेदवारी दिली आहे तर ताळगावमधून दत्तप्रसाद नाईक यांना दुसऱयांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

सावर्डे, मये, पेडणे व काणकोणबाबत निर्णय नाही

ज्या मतदारसंघातील विद्यमान आमदार, मंत्री यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत किंवा मतदार गटसमितीने विरोधात अहवाल दिलेला आहे, अशा मतदारसंघातील उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. सावर्डे, मये, पेडणे व काणकोण या मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पेडणे आणि काणकोण या मतदारसंघातील दावेदार असलेले उमेदवार हे माजी मंत्री आहेत तर मयेतील दावेदार हे सभापती आहेत. सावर्डेचे दावेदार हे विद्यमान आमदार आहेत.

चार उमेदवारांचे भवितव्य 8 रोजी ठरणार

पेडणे व काणकोणच्या उमेदवारीबाबत पक्षाकडे आलेला अहवाल समाधानकारक नाही, असे वाटत असल्यानेच या उमेदवारांच्या नावांबाबत समितीने निर्णय घेतलेला नाही. सभापती अनंत शेट यांच्या उमेदवारीलाही काही कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे. सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्या विरोधात अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. मात्र या चारही इच्छूक उमेदवारांनी प्रबळ दावेदारी केली आहे. त्याचबरोबर निवड समितीसमोर शक्ती प्रदर्शनही केले आहे. या चारही उमेदवारांचे भवितव्य 8 जानेवारीला ठरणार आहे.

कार्यकर्त्यांत अस्वस्थता

पेडणे, मये, काणकोण व सावर्डे या चार मतदारसंघातील उमेदवारी निवड प्रक्रिया लांबल्याने सध्या तेथील भाजप कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचबरोबर इच्छूक उमेदवारही प्रचंड तणावाखाली आले आहेत. उमेदवारी नाकारण्याची चर्चा मतदारसंघात वाढू लागल्याने उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे.

Related posts: