|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईतील 31 जानेवारीचा मराठा मोर्चा स्थगित

मुंबईतील 31 जानेवारीचा मराठा मोर्चा स्थगित 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई / प्रतिनिधी

मराठा आरक्षण आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर मराठा मोर्चाचे वादळ उठल्यानंतर राजधानी मुंबईत 31 जानेवारीला होणाऱया मराठा मोर्चाला स्थगिती दिली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चा आयोजकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात सर्व जिह्यांत लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले होते. इतकेच नव्हे तर नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही मोर्चा धडकला होता. राज्यभरातील मोर्चानंतर मुंबईतही 31 जानेवारी रोजी महामार्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे त्यामुळे आचारसंहिताही लागण्याची शक्यता असल्याने 31 जानेवारीचा मोर्चा आयोजकांनी स्थगित केला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी याबाबत आयोजकांची बैठक होणार असून, या बैठकीत मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख ठरवणार असल्याचे मराठा मोर्चाचे संयोजक विनोद पोखरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुंबईत यापूर्वी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते तसेच ठाण्यातील मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग नोंदवला होता.

31 जानेवारीलाच मोर्चा

दरम्यान, मुंबईतील मराठा मोर्चाच्या स्थगितीनंतर या मोर्चात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सांगताना मुंबईत हा मोर्चा 31 जानेवारीलाच होणार असल्याचे मराठा संघटनेचे कार्यकर्ते विनोद पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. यामुळे मुंबईतल्या मोर्चाच्या तारखेवरून मराठा संघटनांमध्ये दोन गट पाहायला मिळत आहेत.  

 

Related posts: