|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील लढाई थेट शिक्षणमंत्र्यांशी!

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील लढाई थेट शिक्षणमंत्र्यांशी! 

वार्ताहर/ कुडाळ

सरकार व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांचा छळ सुरू केला आहे. येत्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील लढाई थेट शिक्षणमंत्र्यांशी आहे. सरकारचे अशैक्षणिक धोरण नेस्तनाबूत केल्याशिवाय शिक्षक स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी रविवारी येथे शिक्षक भारतीच्या जिल्हा मेळाव्यात व्यक्त केला. सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक भारती स्थापन करून जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

शिक्षक भारती संघटनेचा जिल्हा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा आज येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अशोक बेलसरे होते. राज्य प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, जिल्हा संघटक कमलेश गोसावी, धनाजी पाटील, अमोल गंगावणे, रुपेश नकाते, माणिक खोत, सौ. मूर्ती कासार, सुरेश चौकेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यात 3 फेब्रुवारी रोजी होणाऱया शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे कोकण व नागपूर मतदारसंघातून अनुक्रमे बेलसरे व राजेंद्र झाडे रिंगणात उतरणार आहेत. सध्या भाजपप्रणित शिक्षक परिषदेकडे या जागा आहेत. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या धोरणांना वैतागलेले शिक्षक आपला असंतोष या निवडणुकीत व्यक्त करतील. शिक्षक, मुख्याध्यापकांचा सुरू असलेला छळ आणि ग्क्तरिबांचे अनुदानित शिक्षण बंद पाडण्याचे कारस्थान या मुद्यांवर ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे, असे ते म्हणाले.

या सरकारने शिक्षकांचा छळ सुरू केला. त्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत. शिक्षकांना जेलमध्ये टाकेन, असे तावडे भर सभागृहात बोलले होते. औरंगाबाद येथे शिक्षकांवर साध्या मागणीसाठी गंभीर गुन्हे नोंदविले. ते एवढय़ा लवकर बोललेले खरे करतील, असे आपल्याला वाटले नव्हते. 365 दिवसांत 315 जीआर काढले. पण एकही जीआर लायकीचा नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर ते सर्व रद्द करणार, असेही ते म्हणाले.

Related posts: