|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणे, सावर्डेचा तिढा सुटला

पेडणे, सावर्डेचा तिढा सुटला 

प्रतिनिधी/ पणजी

भाजपच्या उमेदवार निश्चितीबाबत दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या पेडणे, सावर्डे या प्रमुख मतदारसंघासह कुंभारजुवे, पर्वरी या मतदारसंघातील उमेदवारीवर अखेर भाजपच्या उमेदवार निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे, मात्र काणकोण मतदारसंघावरील टांगती तलवार कायम असून काणकोणचा गुंता अद्याप सुटलेला नाही.

गेले अनेक दिवस मये, पेडणे, काणकोण व सावर्डे या प्रमुख मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वारंवार बैठका झाल्या. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत या सर्व बैठका झाल्या. अखेर काल रविवारी पेडणे, सावर्डे, पर्वरी, सांतआंदे, कुंभारजुवे या मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पर्वरीतून गुरुप्रसाद पावसकरांना उमेदवारी

पेडणेसाठी राजेंद्र आर्लेकर, सावर्डे मतदारसंघातून गणेश गावकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कुंभारजुवे मतदारसंघात पांडुरंग मडकईकर यांना तर पर्वरी मतदारसंघातून गुरुप्रसाद पावसकर व सांतआंद्रे मतदारसंघात आमदार विष्णू वाघ यांचे बंधू रामराव वाघ यांना उमेदवारी दिली जाणार आहे.

काणकोणबाबत अनिश्चितता कायम

चर्चेत असलेल्या प्रमुख चार मतदारसंघापैकी पेडणे व सावर्डे या तीन मतदारसंघाबाबत निर्णय घेण्यात आला, मात्र चौथा मतदारसंघ काणकोणबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काणकोण मतदारसंघाचे नेतृत्त्व क्रीडामंत्री रमेश तवडकर करत आहेत, पण या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या चारही मतदारसंघात मंत्री व आमदार नेतृत्त्व करत होते. पेडणेतून मंत्री राजेंद्र आर्लेकर, काणकोणमधून मंत्री रमेश तवडकर, मये मतदारसंघातून सभापती अनंत शेट व सावर्डेतून आमदार गणेश गावकर नेतृत्त्व करत आहेत. पैकी आर्लेकर, शेट व गावकर यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आहे.

सांतआंद्रेत रामराव वाघ यांना  संधी

सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार विष्णू वाघ आजारी असल्याने या मतदारसंघातून वाघ यांचे बंधू रामराव वाघ यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांच्या नावावर रविवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. केपे मतदारसंघातून प्रकाश वेळीप तर पर्ये मतदारसंघातून विश्वजित कृ. राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

मडगाव, फोंडय़ाबाबत अद्याप निर्णय नाही

दक्षिण गोव्यातील मडगाव व फोंडा या मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मडगाव मतदारसंघातून दोन, तीन नावावर प्रामुख्याने चर्चा सुरू आहे, तर फोंडा मतदारसंघातील उमेदवारी कुणाला द्यावी याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. नावेली मतदारसंघात अपक्ष उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे. अन्य दोन मतदारसंघात अपक्ष उमेदवारानाच पाठिंबा देण्यात येणार आहे. आवेर्तान फुर्तादो यांना भाजपने उमेदवारीची ऑफर दिली होती, पण त्यांनी अनुकुलता दर्शविली नाही.

Related posts: