|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सेना-भाजपा वादाचा काँग्रेसला लाभ : नितेश राणे

सेना-भाजपा वादाचा काँग्रेसला लाभ : नितेश राणे 

मुंबई / प्रतिनिधी

केंद्र-राज्यात व मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपा युतीमधील वादविवाद, खटके, टोमणे, टीका, आरोप-प्रत्यारोप हे प्रकरण आज पालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरूच आहे. सेना-भाजपामध्ये या पालिका निवडणुकीत युती होणार की बिघाडी होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, सेना-भाजपामधील या वादविवादाचा मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच लाभ होईल, असा दावा काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील आमदार नितेश राणे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना केला आहे. याचे कारण विशद करताना नितेश राणे म्हणाले की, शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद पाहता मुंबईकरांना तिसरा पर्याय हवा आहे. आणि तो पर्याय म्हणजे काँग्रेस पक्ष. जनता सेना-भाजपा युतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला पर्याय म्हणून जनता जवळ करेल.

नोटाबंदीचा भाजपाला फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी 1000 व 500 च्या नोटांवर बंदी घातली. त्यामुळे काळा पैसा साठवणाऱयांची  अडचण झाली. मात्र, सामान्य नागरिकांना त्याचा खूपच त्रास झाला. आजही नोटाबंदीतून सामान्य लोक पूर्णत: सावरलेले नाहीत. त्यामुळे या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका भाजपाला या निवडणुकीत जरूर बसेल ते म्हणाले.

कोकणी मते काँग्रेसकडे वळविणार, सेनेला झटका देणार

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची व्होटबँक असलेली कोकणी मते यावेळी आम्ही ठिकठिकाणी कोकणी मेळावे आयोजित करून काँगेसकडे वळविणार आहोत. शिवसेनेला चांगलाच झटका देणार आहोत, असे नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

भांडुप, जोगेश्वरी, बोरिवली, लालबाग, गिरगाव, कांदिवली, चारकोप, घाटकोपर आदी भागात कोकणी लोकांची मोठी व्होटबँक आहे. मुंबईतील एकूण मराठी लोकामंध्ये 60 टक्के कोकणी आहेत. जवळजवळ 227 पैकी 85 वॉर्डात तरी कोकणी व्होटबँक चांगली आहे. काँगेसतर्फे विलेपार्ले येथे कोकणी मेळावा भरवला होता. अशाचप्रकारे यापुढे चारकोप व मुंबईतील कोकणी पट्टय़ात मेळाव्यांचे आयोजन करून कोकणी मते काँग्रेसकडे वळविणार आहे. ज्याप्रमाणे गुजराती मते वळविण्यासाठी गुजरातमधील मंत्री, नेते येतात. त्याप्रमाणेच आम्ही कोकणातील नगराध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्षांना मुंबईत प्रचाराला आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: