|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपविरोधात मगो, मंच, शिवसेना युती सज्ज

भाजपविरोधात मगो, मंच, शिवसेना युती सज्ज 

प्रतिनिधी/ पणजी

 भाजप सरकारमधून बाहेर पडलेल्या मगो पक्षाच्या नेतृत्वाखाली मगो, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना युतीची अधिकृत घेषणा काल मंगळवारी पणजीत करण्यात आली. ही युती राज्यातील 37 जागा लढविणार असल्याचे स्पष्ट करुन युतीचे मुख्यमंत्री म्हणून सुदिन ढवळीकर यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. राज्यात भाजपविरोधी प्रचंड लाट असून गोमंतकीय जनता युतीचे सरकार सत्तेवर आणणार आहे, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. तिन्ही पक्षाचे जेष्ठ नेते, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या 37 जागा लढविण्याचे ठरविण्यात आले असले तरी उर्वरीत तिन्ही जागांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

काँग्रेस, भाजपने गोवेकरांना फसविले

 भाजप व कॉंग्रेस सरकारने गोव्याच्या मुळ प्रश्नांकडे पूर्णपणे दुलर्क्ष करुन जनतेची

फसवणूक केली आहे. 2012 च्या निवडणुकीत जी आश्वासने भाजपने दिली ती पूर्ण न करता त्याबाबत यु टर्न घेण्यात आले. काँग्रेस व भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गोव्याच्या मूळ समस्या सोडविण्यात या पक्षांना अपयश आले असून त्यांनी स्वार्थ साधण्यासाठी गोव्याला नव्या समस्यांच्या गर्तेत लोटले आहे. त्यामुळे गोमंतकीय मतदार या दोन्ही पक्षांना झिडकारुन मगो-मंच-शिवसेना या युतीला प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास यावेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये व्यक्त केला.

 युती 21 पेक्षा अधिक जागा जिंकणार

 गोव्याची संस्कृती, भाषा, निसर्गसंपत्ती, पर्यावरण, पारंपरिक व्यवसाय याचे जतन करण्यासाठी तसेच गोव्याच्या मातीतील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी ही युती करण्यात आली आहे. गोव्याच्या राजकीय क्षितिजावर नव्याने उदयास अलेला गोवा सुरक्षा मंच व शिवसेना हे दोन्ही पक्ष गोव्याच्या संस्कृती रक्षणासाठी लढत आहेत. या दोन्ही पक्षांचे विचार व मगो पक्षाचे विचार समान असल्याने ही युती करण्यात आली आहे. ही महायुती येणाऱया गोवा विधानसभा निवडणुकीत 21 पेक्षा जास्त जिंकून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार स्थापन करणार आहे, असे माजी मंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

 ही युती सर्वसामान्यांच्या इच्छेनुसार

 ही युती व्हावी, ही गोव्यातील सर्वसामान्यांची इच्छा होती, तिचा सन्मान करत ही युती झालेली आहे. भाजपने 5 वर्षांच्या राजवटीत कशी लोकांची फसवणूक केली हे जनतेने पाहिले आहे. मगो या सरकारमधील घटक होता, पण भाजपने मगोला विश्वासात घेतले नव्हते. भाजपने आपल्याला हवे ते निर्णय घेतले म्हणून ही युती करण्यात आली. युतीचे जास्तीतजास्त उमेदवार युवा व उच्च शिक्षित आहेत. युतीचे सरकार सत्तेवर यावे, यासाठी युतीचे सर्व कार्यकर्ते निस्वार्थपणे काम करणार आहेत. युतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य ंकरावे, असे आवाहन माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

इंग्रजीचे अनुदान बंद करणार : वेलिगंकर

 गोव्याची संस्कृती टिकविणे हा या युतीचा मुख्य हेतू आहे, प्रत्येक पक्षाचे धोरण वेगळे असले तरी या युतीचे विषय मात्र समान असणार आहेत. युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर इंग्रजी प्राथमिक शाळांना देण्यात येणारे अनुदान पूर्णपणे बंद केले जाणार आहे. युतीचे प्रश्न सल्लागार मंडळ बैठक घेऊन सोडविणार आहे. मगो पक्ष हा गोव्यातील जुना पक्ष असून शिवसेना व गोसुमंच या पक्षांचे विचार एक आहेत. भाजपला सत्तेवरुन हटविणे हे युतीचे मुख्य ध्येय आहे. युतीचे सरकार सत्तेवर येणार असून ढवळीकर हेच मुख्यमंत्री होणार आहेत, असे यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिगंकर यांनी सांगितले.

युती गोव्याला चांगले दिवस आणणार : संजय राऊत

 ही युती गोव्याच्या जनतेसाठी चांगले दिवस घेऊन येणार आहे. गोव्याची संस्कृती टिकविण्यासाठी तसेच गोव्याच्या मातीतील प्रश्न सोडविण्यासाठी युती तयार झाली आहे. मगो व गोसुमं या पक्षाचे विचार हे शिवसेना पक्षाच्या विचारांना जोडणारे असल्याने ही भक्कम आहे. शिवसेना हा जुना पक्ष असून महाराष्ट्राप्रमाणे आता गोव्यातही हा पक्ष कार्यरत राहणार आहे. युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी युतीचे कार्यकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत, असे यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

 पंतप्रधानांनी पर्रीकरांवर कारवाई करावी

 भाजप सरकारच्या विरोधात असणारा राग जनता येणाऱया 4 तारखेच्या मतदानावेळी मतदानातून व्यक्त करणार आहे. देशात दहशतवादी हल्ले होत आहेत. जवान शहीद होत असताना संरक्षणमंत्री गोव्यात उमेदवारांना तिकीट वाटण्याचे काम करतात. वेळोवेळी देशावर हल्ले झाले तेव्हा पर्रीकर हे गोव्यात होते. ते दिल्लीपेक्षा गोव्यात जास्तवेळ असतात. पंतप्रधानांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

 गोसुमंचचे नेते, कार्यकर्ते चांगले अनुभवी

  भाजपला दोन वेळा सत्तेवर आणणारे लाखो कार्यकर्ते आता गोसुमंकडे आले आहेत. गोसुमं जरा नवीन पक्ष असला तरी यातील नेते, कार्यकर्ते हे राजकारणाचा चांगला अनुभव असलेले आहेत. आपल्या उदेवाराला विजयी करण्यासाठी तसेच आपले सरकार सत्तेवर आणण्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते आहेत. निवडणूक कशी लढवावी, हे या पक्षाला कोणी सांगायची गरज नाही. भाजपला कंटाळलेली जनता या कार्यकर्त्यांच्या बरोबर ठामपणे उभी राहिली आहे, त्यामुळे युतीला 21 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळणार आहे, असा विश्वास  गोसुमंचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी व्यक्त केला.

गोसुमंचला सहा तर शिवसेनेला चार

 या युतीचा घटक पक्ष असलेल्या गोवा सुरक्षा मंचला सहा मतदारसंघ देण्यात आले आहेत. त्यात शिवोली, पणजी, मये, सांखळी, वेळ्ळी, कुडचडे या मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेला साळगाव, थिवी, कुंकळी व मुरगांव हे चार मतदारसंघ देण्यात आले आहेत. उरलेल्या सर्व मतदारसंघामध्ये मगो पक्षाने आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 पत्रकार परिषदेच्यावेळी जीवन कामत, शिवसेनेचे राज्य प्रमुख शिवप्रसाद जोशी, मगोचे गजानन तिळू नाईक, प्रताप फडते तसेच तिन्ही पक्षांचे नते व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते.

Related posts: