|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली

गुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

वेगवान वाऱयामुळे समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली हर्णे-दापोली येथील नौका गुहागर समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने जवळच असलेल्या दुसऱया मच्छिमारी नौकेने बुडणाऱया नौकेतील 7 खलाशांना मोठय़ा शर्थीने वाचवण्यात यश मिळवले. नौका बुडाल्यामुळे सुमारे 17 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ही घटना गुहागर किनाऱयापासून 35 ते 50 वाव अंतरातील खोल समुद्रात घडल्याची माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे. हर्णे येथील मच्छीमार अख्तरी अजिज होडेकर यांच्या मालकीची भाडेतत्वावरील नौका असल्याचे सांगण्यात आले. याचे मूळ मालक रत्नागिरी-मिरकरवाडा येथील कासम मजगांवकर हे आहेत. बुडालेल्या नौकेचे नाव ‘अल मुजदल्फा’ असे आहे. ही नौका 9 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजता मच्छिमारीसाठी बाहेर पडली होती. या नौकेवर तांडेल सत्यवान गणपत पावसकर (रा. साखरी आगर गुहागर), खलाशी सुरेश डोर्लेकर, अनिल सुवारे, मोहन बसणकर, गुरुदास पावसकर, सत्यवान पालशेतकर, संदीप जातकर असे 7 जण होते.

मासेमारी केल्यानंतर ही नौका मंगळवारी 10 जानेवारी रोजी रात्री 11.30 वा.च्या सुमारास हर्णे बंदराकडे निघाली होती. गुहागरपासून 35 ते 50 वाव अंतरातून प्रवास करत असताना ही नौका हेलकावे खात होती. वादळी वाऱयांमुळे समुद्रही खवळलेला होता. मोठय़ा लाटा उसळत असल्यामुळे नैकेला स्थिर ठेवता येत नव्हते. बराच वेळ हेलकावे खात असताना अचानक अल-मुजदल्फा या नौकेचा तोल एका बाजूला गेला. ती नौका समुद्रात कलंडली. समुद्राचे पाणी वेगाने नौकेत घुसू लागल्यावर तांडेलासह खलाशांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली.

मासेमारी करणाऱया या नौका एकजुटीने खोल समुद्रात असल्यामुळे जवळच असलेल्या ‘नंद यशोदा’ ही नौका मदतीसाठी पुढे सरसावली. बुडणाऱया नौकेवरील खलाशांना सुखरुप वाचवण्यात आले. या नौकेवरील सर्व खलाशी जयगड बंदरामध्ये आणण्यात आले होते. नंद यशोदाचे तांडेल काशिनाथ शाम हेदवकर यांच्यासह सहकारी खलाशांनी ही मोहीम यशस्वी केली. बुडालेल्या अल मुजदल्फा ही नौका जाळय़ासह खोल पाण्यात बुडाली. त्यामुळे नौकेचे सुमारे 17 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस वातावरणात बदल झालेला आहे. सकाळच्या सुमारास वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे समुद्र खवळलेला आहे. मच्छिमारांना मत्स्य़ विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

Related posts: