|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दगडफेक करून चार वाहनांच्या काचा फोडल्या

दगडफेक करून चार वाहनांच्या काचा फोडल्या 

प्रतिनिधी / बेळगाव

घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या चार वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतर रुक्मिणीनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून चोरीसाठी हा प्रकार घडविण्यात आला का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी शहापूर, टिळकवाडी, चन्नम्मानगर, कामत गल्ली, भाग्यनगर परिसरातही दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. रुक्मिणीनगर येथे मात्र कारमधील किमती वस्तू लांबविण्यासाठी काचा फोडण्यात आल्याचा संशय आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

रुक्मिणीनगर येथील केएमएफ डेअरीसमोर असलेल्या डॉ. आर. एस. पटेल यांच्या मालकीची केए 22 एस 3962 व निवृत्त बँक व्यवस्थापक व्ही. डी. नेर्लेकर यांच्या केए 22 झेड 9833 क्रमांकाच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याच परिसरात घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या आणखी दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

यापूर्वी झालेल्या अनेक घटनांत कारच्या पाठीमागच्या किंवा समोरील काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला होता. आता बाजूची काच फोडण्यात आली आहे. यासंबंधी बुधवारी रात्री माळमारुती पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप फिर्याद दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Related posts: