|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » योग्य सुविधा पुरविल्यास शेतकरी स्वावलंबी बनेल

योग्य सुविधा पुरविल्यास शेतकरी स्वावलंबी बनेल 

प्रतिनिधी/ चिकोडी

शेती व शेतकऱयांच्या विकासासाठी सरकारने केवळ विशेष योजना लागू करून चालणार नाही तर त्या योजना शेतकऱयांपर्यंत पोहचतात की नाही याची शहानिशा करणे गरजेचे आहे. योग्यवेळी उत्तम गुणवत्तेचे बियाणे, पाणीपुरवठा, वीजपुरवठा व शेतकऱयांच्या उत्पादनास रास्त भाव दिल्यास शेतकरी सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षाच करणार नाही. तो स्वावलंबी बनेल, असे प्रतिपादन येडूर येथील श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांनी केले.

हिरेकुडी (ता. चिकोडी) येथे नुकतेच साई गणेश हायटेक नर्सरी पॉलीहाऊस व साई गणेश ऍग्रो केंद्राच्या उद्घाटनानिमित्त आयोजित एक दिवसाच्या कृषी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

स्वामीजी पुढे म्हणाले, मानवी आरोग्य निरोगी व्हावे यासाठी विविध शोध लावले जात आहेत. तसेच निरोगी पिकासाठीही विविध शोध लावले जात आहेत. त्याचा फायदा घेत शेतकऱयांनी पिकांचे नियोजन करावे. शेतकऱयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. शेतकऱयांनी व्यसनाला फाटा देत निरोगी आरोग्य राखत शेती करावी. सेंद्रीय शेतीला प्राधान्य देत पिकांचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून कृषी खात्याचे सहसंचालक वेंकटरामरेड्डी पाटील म्हणाले, दर्जेदार पीक घेण्यासाठी त्या पिकाला संरक्षणही फार महत्त्वाचे आहे. कमी जागेत नियोजनबद्ध शेती केल्यास फायदा मिळविता येऊ शकतो. त्यासाठी पीक पद्धतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कमी जमिनीत अधिक उत्पादनाचे प्रयोग अनेक शेतकऱयांनी यशस्वी केले आहेत. त्यांच्या नियोजनाची माहिती मिळवून शेतीत बदल घडवावेत, असे त्यांनी सांगितले.

बागलकोट येथील डॉ. वाय. के. कोटेकल यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जैनापूर व अंबिकानगरच्या स्वामीजींच्या सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रगतशील शेतकरी हनुमंत हलकी व बसनगौडा पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अरभावी सीसीएच कॉलेजचे डीन डॉ. एम. एस. कुलकर्णी, कृषी उपसंचालक एल. आय. रोडगी, सहाय्यक संचालक मंजुनाथ जनमट्टी आदी उपस्थित होते.