|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बेकायदा पर्ससीननेट विरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक

बेकायदा पर्ससीननेट विरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

पर्ससीन मच्छिमारीसाठी 31 डिसेंबरनंतर अधिकृत बंदी असताना देखील आज शेकडो अधिकृत व अनधिकृत पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारी नौका राजरोस मासेमारी करीत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृति समितीने केला आहे. पर्ससीन मासेमारी तत्काळ बंद करण्यासाठी समितीच्यावतीने येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रशासनाला निवेदन सादर केले. अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो पारंपरिक मच्छीमार उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्हय़ातील 274 पर्ससीन व मिनी पर्ससीन नौकांनी अटी व नियमांप्रमाणे 12 वाव बाहेर मासेमारी करणे बंधनकारक आहे. असे असताना येथील सागरी भागात अनधिकृत पर्ससीन नौकांसह सुमारे 350 अनधिकृत पर्ससीन व मिनी पर्ससीन नौका अटीं शर्तींचे उल्लंघन करीत असल्याचा आक्षेप समितीने घेतला आहे. 12 वावाच्या आत अगदी किनाऱयालगत बेकायदा मासेमारी करत असल्याचे म्हणणे मत्स्य प्रशासनाकडे मांडले आहे. त्या बाबत अनेक तक्रारी करूनही मत्स्य खात्याच्या अधिकाऱयांकडून थातूरमातूर कारणे सांगून नगण्य अशी कारवाई केली जात असल्याचेही निवेदनात समितीने म्हटले आहे.

जिल्हय़ातील अनेक बंदरात बेकायदा राजरोस पर्ससीन मासेमारी सुरू आहे. वरवडे येथील सुमारे 15 हून जास्त मिनी पर्ससीन नौका मासेमारी परवाने नसतानाही या हंगामातदेखील ऑगस्ट महिन्यापासूनच आजमितीस पर्ससीन मासेमारी करत असल्याच कृति समितीचे म्हणणे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. अनेक नौकांवर रजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) नमूद नाहीत. ही बाब सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशा बेकायदा पर्ससीन मासेमारींवर मत्स्य खात्याने तत्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शेकडो पारंपरिक मच्छीमार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृति समितीच्यावतीने खलील वस्ता यांनी दिला आहे.