|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘चॅम्पियन’ची वक्तृत्व कला स्पर्धा भविष्यातील वक्ते घडवेल

‘चॅम्पियन’ची वक्तृत्व कला स्पर्धा भविष्यातील वक्ते घडवेल 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

Qबदलत्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वैयक्तिक कौशल्य विकासही महत्वाचा ठरत आहे. यामध्ये वक्तृत्व कलाही मोलाची ठरते. वक्तृत्व कला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यी आपले करिअर घडवू शकतात. त्यामुळे शिक्षणाबरोबर कौशल्य विकास आत्मसात करण्याची गरज आहे. ‘तरुण भारत’ने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बळ देण्यासाठी आयोजित केलेली वक्तृत्व कला स्पर्धा भविष्यात मोठे वक्ते घडविण्यास सहाय्यकारी ठरेल, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी काढले.

‘तरूण भारत’ परिवाराने शालेय विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना प्रोत्साहन, बळ देण्यासाठी चॅम्पियन वक्तृत्व कला स्पर्धा 2017 चे आयोजन केले आहे. जिल्हय़ातील विविध तालुक्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. मंगळवारी कोल्हापूर शहर विभागातील वक्तृत्व कला स्पर्धेचे उद्घाटन ‘तरूण भारत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेस शिक्षणाधिकारी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा तास घेताना मार्गदर्शनाचे धडे घेतले. यावेळी ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी शिंदे म्हणाल्या, विविध विषयांवरील पुस्तके, ग्रंथांचे वाचन केल्यास ज्ञानवृद्धीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांतून भविष्यात एक प्रभावी वक्ता निर्माण होऊ शकतो. वक्तृत्वाच्या जोरावर तुम्ही स्वत:ला सिध्द करू शकता, त्यासाठी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन भविष्यातील चांगला माणूस आणि वक्ता म्हणून स्वतःला सिद्ध करा, असेही शिंदे यांनी सांगितले.

‘तरुण भारत’चे विद्यार्थ्यांसाठी प्रभावी व्यासपीठ

सध्या केंद्र आणि राज्य शासनातर्फेही कौशल्य विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. आज ‘तरुण भारत’ने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. तसेच ‘तरुण भारत’च्या ‘चॅम्पियन’ आणि ‘स्कॉलरशिप मित्र’ या पुरवण्या शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत. कौशल्य विकास साधण्यासाठी वाचन, श्रवण आणि मनन यांची सवय असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना या सवयी लागण्यासाठी शिक्षकांचे संस्कारही तितकेच महत्वाचे असतात. पाठय़पुस्तकांच्या वाचनाबरोबर ग्रंथालयात जावून अवांतर वाचन करण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुस्तकातील एखादे आवडलेले वाक्य व संदर्भ लिहून ठेवण्याची सवय ठेवा. गाडगे महाराजांनी वक्तृत्वाच्या जोरावरच समाज परिवर्तन केले. त्यामुळे   ‘तरुण भारत’ने वक्तृत्व स्पर्धा हा उपक्रम स्तुत्य आहे. यापुढे सर्व शाळांना या स्पर्धा खुल्या ठेवाव्यात, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘तरुण भारत’चे प्रयत्न : जयसिंग पाटील

प्रास्ताविकात  ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील म्हणाले, ‘चॅम्पियन’ आणि स्कॉलरशिप मित्र या शैक्षणिक पुरवण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी ‘स्कॉलरशिप मित्र’ शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी ‘ चॅम्पियन वक्तृत्व स्पर्धा 2017’चे आयोजन केले आहे. एकाचवेळी या स्पर्धा 12 तालुके व इचलकरंजी व कोल्हापूर शहरात आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेतील दोन फेऱयात प्रथम तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यातील प्रथम क्रमांक असणाऱयांची वेगळी स्पर्धा घेऊन त्यामध्ये जो विद्यार्थी प्रथम येईल तो ‘चॅम्पियन’ ठरणार आहे.

यावेळी ‘तरुण भारत’चे प्रशासन अधिकारी राहूल शिंदे, वितरण व्यवस्थापक सचिन बर्गे, जाहिरात ग्रामीण व्यवस्थापक आनंद साजणे, जाहिरात शहर व्यवस्थापक मंगेश जाधव, पर्यवेक्षक शा. कृ. पंत वालावलकर शाळेचे संजय सौंदलगेकर, सदाशिव ढवळ, राजाराम हायस्कूलच्या कुसुम पाटील, वितरण विभागाचे मयूर गिजवणेकर, दिपक दर्पणकर, सचिन पाटील, महेश सिसाळ, जयदीप पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.