|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस दलातील ऑर्डली पद्धत रद्द करणार

पोलीस दलातील ऑर्डली पद्धत रद्द करणार 

प्रतिनिधी/ बेळगाव

ब्रिटिश काळापासून पोलीस दलात सुरू असलेली ऑर्डली पद्धत त्वरित रद्द करण्यात येणार आहे. अधिकाऱयांच्या घरकामाला जुंपलेल्या पोलिसांना पुन्हा पोलीस कामासाठी जुंपण्यात येणार आहे. यापूर्वी अधिकाऱयांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.

बेळगाव उत्तर विभागातील 1 हजार 555 पोलिसांना शुक्रवारी बढती देण्यात आली. सुवर्णसौधमध्ये गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष कार्यक्रमात पोलिसांना बढती देण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. जी. परमेश्वर यांनी वरील घोषणा केली. पोलिसांनी शिस्तीचे पालन करून खाकी वर्दीची प्रति÷ा जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस दल म्हणजे सरकारचा एक प्रमुख भाग आहे. जनतेच्या समस्यांना पोलीस कशा पद्धतीने भिडतात यावर सरकारची प्रतिमा ठरते. त्यामुळे पोलिसांनी अधिक जनस्नेही व्हावे. शिस्तबद्ध आणि जागरुकपणे कर्तव्य करावे. असे सांगून तुमकूर येथे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने एका महिलेवर बलात्कार केलेल्या प्रकरणाचा उल्लेख करून एका अधिकाऱयाच्या चुकीमुळे संपूर्ण पोलीस दलालाच दोषी ठरविण्यात येते. पर्यायाने सरकारचीही बदनामी होते. त्यामुळे पोलिसांनी याचा विचार करावा, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

जर्मनीच्या धर्तीवर कर्नाटकातही पोलीस दलाला अधिक जनस्नेही बनविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यासाठी क्रिया योजना तयार करण्यात येत आहे. पोलिसांना उत्तम पगार, भत्ते, कॅन्टीन सुविधा देण्यासाठी सरकारची तयारी आहे. कॅन्टीन सुविधा राज्यातील सर्व जिह्यांना पुरविण्यात येणार आहे. याबरोबरच वेळोवेळी बढतीही देण्यात येणार आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी गृहमंत्र्यांचे सल्लागार व निवृत्त आयपीएस अधिकारी केंपय्या, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. रामचंद्र राव, बेळगावचे पोलीस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट, हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त पांडुरंग राणे, बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांतेगौडा, बागलकोटचे सी. बी. रिशंत, गदगचे के. संतोषबाबू, धारवाडचे धर्मेंद्रनाथ मीना, पोलीस उपायुक्त जी. राधिका, अमरनाथ रेड्डी आदी उपस्थित होते.

सबबीट व्यवस्था आता संपूर्ण राज्यात

बेळगाव जिह्यात जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांतेगौडा यांनी सबबीट व्यवस्था अंमलात आणली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे प्रत्येक भागातील जनतेशी पोलिसांचा थेट संपर्क येतो. पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी होते. यापूर्वी पोलीस सायकलीवरून बीट व्यवस्थेसाठी फिरत होते. आता बीटसाठीच वाहनांचा वापर केला जातो. ही व्यवस्था संपूर्ण राज्यात अंमलात आणण्यात येणार आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील 12 हजार पोलिसांना बढती देवून त्यांना भत्ते देण्यासाठी सरकारने 225 कोटी रुपये खर्च केले आहेत. राज्य सरकारचा निर्णय पोलिसांना लाभदायी तर आहेच. त्याबरोबरच क्रांतीकारक निर्णयही आहे, असे गृहमंत्र्यांचे सल्लागार केंपय्या यांनी सांगितले.