|Thursday, December 12, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मनाजी पाटील देहगावाचा

मनाजी पाटील देहगावाचा 

आपला देह म्हणजे इंद्रियांचा समुदाय. यालाच संतसाहित्यात इंद्रियग्राम, देहगांव असेही संबोधन वापरले आहे. या सगळय़ा इंद्रियात प्रमुख इंद्रिय आहे मन. तुकाराम महाराज म्हणतात –

सकळां इंद्रिया मन हे प्रधान ।

सर्व इंद्रियांवर सत्ता चालते ती मनाची. आपल्या मनाच्या आदेशाप्रमाणे आपली इंद्रिये वागत असतात. त्यामुळेच मनाला या इंद्रियग्रामाचा, देहगावाचा प्रमुख मानले आहे. एकनाथ महाराजांचे जोशी हे एक भारुड आहे. या अभंगात नाथांनी आपल्या मनाचे गमतीदार वर्णन केले आहे –

मनाजी पाटील देहगावाचा । विश्वास धरुं नका त्याचा । घात करील नेमाचा । पाडील फशी ।।

देहगावाचा पाटील मनाजी (मन) असून त्याचा विश्वास धरू नका, हा नेमका घात करील आणि फशी पाडील, असे नाथ बजावतात.

मनाचा स्वभावच असा आहे की ते जाऊ नये तिथे जाते, विचार करू नये त्याचा आणि विचार करू नये तेव्हा विचार करते.

एक भिक्षू एकदा भगवान बुद्धाकडे आला आणि म्हणाला, ‘भगवान, मला निर्वाण कसे मिळेल?’ भगवान बुद्ध हसले आणि त्याला म्हणाले, ‘अरे सोपे आहे. हे बघ, उद्या ध्यानाला बसण्यासाठी डोळे बंद केलेस की तो सोनेरी हत्ती मात्र मनात येऊ देऊ नकोस.’ दुसऱया दिवशी तो भिक्षू ध्यानाला बसला, डोळे बंद केले आणि काय आश्चर्य, सोनेरी हत्ती डोळय़ासमोर हजर! काय त्याचा तो भव्य दिव्य देह! काय त्याचा तो सोनेरी चमकणारा दिपवून टाकणारा वर्ण! त्याचे हिरे माणकांनी मढवलेले दागिने! काय त्या सोनेरी हत्तीची डौलदार चाल! अरे वा, हा हत्ती सोंड वर करून कोणाला नमस्कार करतो आहे बरे? हा भिक्षू कोण? अरे हा तर मीच! वा रे वा, काय माझा सन्मान! इतक्मयात अचानक त्या हत्तीने सोंडेत भिक्षूला पकडला, गरागरा फिरवला आणि दूर फेकून दिला. भिक्षू धडकन जमिनीवर आपटला आणि खाडकन त्याचे डोळे उघडले. तो धावतच भगवान बुद्धाकडे आला आणि त्याने घडलेला सारा प्रकार त्यांना सांगितला. तो पुरता घाबरून गेला होता. भगवान त्याला म्हणाले, ‘अरे तू प्रत्यक्षात सोनेरी हत्ती कधी पाहिला आहेस काय? सोनेरी रंगाचा हत्ती कुणी पाहिल्याचे तुला कधी कुणी सांगितले आहे काय? सोनेरी हत्तीचे वर्णन कधी कुठल्या ग्रंथात वाचले आहेस काय? मग हा सोनेरी हत्ती आला कोठून? असे बघ, तू निश्चय केलास की ध्यानाला बसल्यावेळी सोनेरी हत्ती तेवढा मनात आणू द्यायचा नाही. आणि तुझ्या मनाने नेमके त्याचवेळी ठरवले की तू ध्यानाला बसलास रे बसलास की सोनेरी हत्ती तुझ्या बंद डोळय़ासमोर हजर करायचा. जगात कुठेही नसलेला सोनेरी हत्ती तुझ्या मनानेच निर्माण केला. हे मन जिंकलेस की निर्वाणाचा मार्ग मिळेल.’

Related posts: