|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुठ्ठाळी, वेळ्ळी सवेंदनशील

कुठ्ठाळी, वेळ्ळी सवेंदनशील 

राज्यातील 95 मतदान केंद्रे संवेदनशील

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात तब्बल 95 मतदान केंद्रे आणि कळंगूट, सांताप्रुझ, कुठ्ठाळी, वेळ्ळी हे चार मतदारसंघ संवेदनशील आहेत. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. दुसऱया बाजूने बारवरील कारवाई करताना कळंगूट व इतर ठिकाणी मिळून खुल्या जागेत सुमारे 5 लाखाहून अधिक किमंतीचे 7174 लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाला यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

 कॅसिनोवरही आयोगाची करडी नजर

 कॅसिनोवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून तेथे जर मोठय़ा प्रमाणात रोकड घेऊन कोणी आले – गेल्यास त्याची चौकशी केली जाणार आहे. तसेच त्या रकमेबाबत पुरावे मागण्यात येणार आहेत. कॅसिनोचालक मालकांबरोबर झालेल्या बैठकीत हे ठरविण्यात आले असून त्यावर एकमत झाल्याचे कुणाल म्हणाले.

 आचारसंहितेचे शिस्तबद्ध पालन

गोव्यातील विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून आचारसंहितेचे पालन शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे. गंभीर स्वरूपाच्या कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. ज्या तक्रारी आल्या, त्यांची पडताळणी व खातरजमा तातडीने करण्यात येत असून राज्यभरात 80 भरारी पथके त्यासाठी कार्यरत आहेत. भाजपच्या जाहिरातींसंदर्भात काही तक्रारी आल्या असून त्यावर सुनावणी चालू आहे. कायदा सुव्यवस्था चोख असून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे, शांतपणे चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

हणजुणचे पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले तरी त्यांनी कारवाई केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे कुणाल यांनी सांगितले. 95 टक्के परवानाधारक असलेल्यांनी त्यांची शस्त्रे पोलीस खात्यात जमा केली असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 897 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय त्यांच्याकडून जामीन घेण्यात आल्याची माहिती कुणाल यांनी दिली. राज्यभरात 22 नाके तपासणीसाठी उभारण्यात आले असून राखीव दलाच्या पोलीस तुकडय़ा राज्यातील अनेक भागात संचालन करीत आहेत. अनेक ठिकाणचे पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकण्यात आले असून तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही होत असल्याचा दावा कुणाल यांनी केला.

हेमा सरदेसाई यांचा राजीनामा

मतदार जागृतीसाठी ‘राज्य प्रचारक’ म्हणून नेमण्यात आलेल्या सुप्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याविरोधात ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्याकडून तक्रार आल्यानंतर त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे. तो विचाराधीन असून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असे कुणाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts: