|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवबाग मतदारसंघ शिवसेनेचाच!

देवबाग मतदारसंघ शिवसेनेचाच! 

मालवणदेवबाग जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यावर आमचाच हक्क कायम राहणार आहे. भाजप समवेत युतीची बोलणी होताना आणि युती करताना देवबाग वगळून इतर मतदारसंघावर चर्चा करण्यात येत आहे. आम्ही देवबाग कधीच भाजपला देणार नाही, अगर त्यावर चर्चाही करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित खोबरेकर बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, विभागप्रमुख प्रवीण लुडबे, उपशाखाप्रमुख प्रवीण रेवंडकर, युवा शाखाप्रमुख चंद्रकांत खोबरेकर, सन्मेष परब, किसन मांजरेकर, तपस्वी मयेकर, महेश शिरपुटे, अनिल केळुसकर आदी उपस्थित होते.

देवबाग मतदारसंघातील सर्व गावांमध्ये मतदार संपर्क अभियान 27 पासून राबविण्यात येणार आहे. यात शिवसेनेच्यावतीने या मतदारसंघात करण्यात आलेली विकासकामांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. तसेच जनतेच्या समस्याही जाणून घेण्यात येणार आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झालेले असल्याचे खोबरेकर यांनी सांगितले.

देवबाग मतदारसंघातील विकासकामांसाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. किनारपट्टीवर धूप संरक्षक बंधारे, मच्छीमारांना त्रासदायक ठरणारा पर्ससीनचा प्रश्न शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सुटला आहे. त्यामुळे याठिकाणची जनता नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी राहिलेली आहे. शिवसेना उमेदवारांची घोषणा आमदार वैभव नाईक हे करणार आहेत. भाजप सोबत सन्मानाने युती झाल्यास आम्ही त्यांच्यासमवेत काम करणार आहोत. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. सध्यातरी आम्ही देवबाग आणि मसुरे मतदारसंघात मतदार संपर्क अभियान सुरू केलेले असून याचा शुभारंभ शुक्रवारी आमदारांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे गोवेकर यांनी स्पष्ट केले.

Related posts: