|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विद्युततारेने दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे

विद्युततारेने दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे 

वार्ताहर/ सावर्डे

ट्रकमध्ये अडकून रस्त्यावर कोसळलेली विद्युततार दुचाकीस्वार तरूणाच्या मानेत अडकून त्याचे शीर धडावेगळे झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डे-पिंपळमोहल्ला येथे बुधवारी सकाळी 10.30 वाजता घडली. तसेच दुसरा दुचाकीस्वार खाली वाकल्याने सुदैवाने बचावला असून तो रस्त्यावर पडल्याने जखमी झाला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले.

   मयूर मधुकर देवरूखकर (26, संगमेश्वर) असे ठार झालेल्या, तर महेश पवार (सावर्डे) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर पिंपळमोहल्ला ते धवल इस्टेट अशी महामार्गावरून 11 केव्ही विद्युतवहिनी गेली आहे. मात्र या वाहिनीला लावण्यात आलेल्या गार्डींच्या तारा गंजून तुटून चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱया  ट्रकच्या हुकात अडकून ओढल्या गेल्या. याचवेळी मयूर देवरुखकर चिपळूणला कामावर जात असताना त्याला ताणलेल्या तारा दिसल्या नाहीत. त्यामुळे तो या तारांमध्ये पूर्णत: गुरफटला व त्याची दुचाकी 61 फूट फरफटत गेली आणि  त्याची मान तारेत अडकल्याने त्याचे शरीर रस्त्यावर मध्यभागी क्षणार्धात कोलमडले. तसेच रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला.

 या घटनेनंतर उपस्थित तरुण व पोलिसांनी मयूरचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेने नेला. तसेच त्याची दुचाकी व ट्रक पोलीस स्थानकात हलवण्यात आला. मात्र तरीही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने जमाव संतप्त झाला. तसेच संतप्त जमावाने पोलिसांसह मयूरचे प्राण घेतलेली तार महावितरण कार्यालयात पोहोच केली.

     महावितरण कार्यालयाला घेराव

युवराज राजेशिर्के, वैभव सावंत, उमेश राजेशिर्के, उमेश पवार, समीर काझी, अरुण वारे, महेश चव्हाण, संदीप राणे यांच्यासह सुमारे 150 तरूणांनी महावितरणच्या सावर्डे कार्यालयावर धडक देत या घटनेला जबाबदार महावितरण असून संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच मयूरचा मामा संदीप राणे व जमावाने संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला. तरुणांचा आक्रमकपणा पाहून सावर्डे कार्यालयीन प्रमुख चांदणे मुर्श्चित पडले. दरम्यान, सावर्डेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगोळे यांनी कार्यालयात येऊन तरुणांना शांत केले.

Related posts: