|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विजय सरदेसाई यांची बदनामी करणाऱया पुस्तिका, सीडींचे वितरण

विजय सरदेसाई यांची बदनामी करणाऱया पुस्तिका, सीडींचे वितरण 

प्रतिनिधी/ मडगाव

‘गोवा फॉरवर्ड’ने शुक्रवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते अविनाश तावारीस, फातोर्डा काँग्रेस गट पदाधिकारी व एथेल लोबो तसेच भाजप समर्थकांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. हे सारे फातोर्डातील गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई यांची प्रतिमा मलीन करणाऱया सीडी आणि पुस्तिका वितरित करण्यात गुंतले होते, असा आरोप पक्षाध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी या पत्रकार परिषदेत केला.

फातोर्डात भाजप व काँग्रेसचे फिक्सिंग असून काँग्रेस व भाजप पदाधिकारी तसेच समर्थक सीडी, पुस्तिका वाटण्यात गुंतल्याचे एकत्रितपणे सीडी व पुस्तिका वाटण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे, असा दावा यावेळी करण्यात आला.

छापखान्यावरही कारवाईची मागणी

जप्त करण्यात आलेले साहित्य 1.5 कोटीचे असून त्यातील सीडी सुमारे 75 लाख किमतीच्या, तर पुस्तिका सुमारे 75 लाख किमतीच्या आहेत. निवडणूक आयोगाच्या खर्चावर नजर ठेवणाऱया विभागाने यासंदर्भात चौकशी करावी. तसेच ज्या छापखान्यात सदर पुस्तिकांची छपाई झालेली आहे त्यावर छापा टाकावा आणि त्याच्या मालकाविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

निर्वाचन अधिकाऱयांकडे तक्रार

यासंदर्भात गोवा फॉरवर्डतर्फे फातोर्डातील निर्वाचन अधिकारी, जिल्हा निर्वाचन अधिकारी (दक्षिण गोवा), जिल्हा निर्वाचन अधिकारी (उत्तर गोवा) आणि मुख्य निर्वाचन अधिकारी यांना तक्रार देण्यात आली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. गुरुवारी रात्री 9.30 वा. मुरिडा येथे बदनामीकारक आशय असलेल्या पुस्तिका व सीडी वितरित केल्या जाताना फातोर्डातील काही जागरूक नागरिकांनी वाहने अडविली. सदर वाहनांत एथेल लोबो, अविनाश तावारीस, नेल्सन फर्नांडिस आणि अन्य काही काँग्रेस कार्यकर्ते होते, असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय पहाटे 2 वा. अशा आणखी सीडी व पुस्तिका चंद्रावाडो व मुरिडानजीक वाटल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठलाग केला असता 144 कलमाचा भंग करून जमलेल्या आठ ते दहा लोकांनी त्यांची गाडी रोखली व धमकावून बाहेर सरू दिले नाही. तसेच गाडीतून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. यावेळी नियंत्रण कक्ष व भरारी पथकाकडे संपर्क साधून त्यांनी तत्परतेने प्रतिसाद दिला नाही. तसेच पावस्कर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक उशिरा आले व त्याचे वर्तन पक्षपाती राहिले, असाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

Related posts: