|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नवोदित लेखकांना प्रतिसाद शून्यतेचा फटका

नवोदित लेखकांना प्रतिसाद शून्यतेचा फटका 

विशेष प्रतिनिधी/ पु. भा. भावे साहित्यनगरी

  नवोदित लेखकांना प्रस्थापितांचा कोणताही पाठिंबा मिळत नाही. त्यांच्या लेखनाची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यांची कलाकृती चांगली की वाईट याचाही अभिप्राय दिला जात नाही. आजचे प्रस्थापित हे आत्मकेंद्री झाले आहेत हे नवोदित लेखकांचे मुख्य आव्हान आहे असा टीकेचा सूर नवोदितांचे ‘लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ या परिसंवादात नवोदित लेखकांनी व्यक्त केला. मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे, घन:श्याम पाटील हे नवोदित लेखक या परिसंवादात सहभागी झाले होते. 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात परिसंवाद पार पडला.

आपले मत व्यक्त करताना औरंगाबाद येथील कवी रवी कोरडे यांनी सांगितले की, आपल्याकडील सांस्कृतिक वातावरण पोषक नाही. शिक्षण अद्यापही समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचलेले नाही. लेखकांनाही आपण चांगले लेखक होऊ अशी धारणा नाही. नवोदित लेखकांना या बाहय़ स्वरुपाच्या संघर्षाबरोबरच आंतरिक संघर्षाचाही सामना करावा लागत आहे. लेखकाला आपल्या अनुभवविश्वाशी धरून लिहिण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या जगण्याची अवस्था ही लिखाणातून प्रतिबिंबित होत असते. आपापल्या परंपरेकडे बघून नवलेखन करावे असा सल्ला रवी कोरडे यांनी यावेळी दिला. तर मनस्विनी लता रवींद्रने सांगितले की, आजही अनेक लेखक हे मराठीचे प्राध्यापक आहे. इतर क्षेत्रांमध्ये किंवा व्यवसायात कार्यरत असलेले लोक लिखाणाकडे वळलेले नाहीत किंवा त्यांचे लेखन हे वाचकांपर्यंत पोहोचलेले नाही. एकाच क्षेत्रातील मान्यवरांमुळे साहित्यामध्ये वैविध्यता उपलब्ध होत नाही, अशी खंतही तिने यावेळी व्यक्त केली. नवोदित लेखकांसाठी आर्थिक स्थैर्याचा महत्त्वाचा मुद्दाही तिने यावेळी उपस्थित केला. पूर्णवेळ लेखन करणे हे आजच्या काळात शक्य नाही. पोटापाण्यासाठी नोकरी किंवा जोड व्यवसाय करावाच लागतो असे तिने स्पष्ट केले. परदेशामध्ये नव्या लेखकांना शिष्यवृत्ती दिली जाते. किंवा एक पॅकेज उपलब्ध करून दिले जाते. पण मराठीमध्ये असा कोणताही पर्याय नाही. यामुळे मराठीची पिछाडी होते असे मनस्विनीने सांगितले. नवोदितांसमोर प्रस्थापित लेखकांचे मोठे आव्हान आहे. नवोदितांची कथा किंवा कविता चांगली की वाईट याचाही अभिप्राय दिला जात नाही. वाचनसंस्कृती संपत चालली आहे अशी ओरड चुकीची आहे. आजही लेखकांच्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीच्या हजारो प्रती एका वर्षातही विकल्या जातात. पण त्याची कुणीही दखल घेत नाही, असे ‘चपराक’चे प्रकाशक घन:श्याम पाटील यांनी सांगितले. त्याने अनेक प्रकाशकांवर सडेतोड टीकाही केली.

लेखकांच्या पुस्तकाची कथा समजून घेण्यासाठीही प्रकाशक लेखकांकडून पैसे घेतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अनेक प्रकाशक नवोदित लेखकांच्या कलाकृतीची दखल घेत नाहीत. त्यांची पुस्तके विकलीच जाणार नाहीत, असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवला जातो. अशी टीका घन:श्याम पाटील यांनी केली. सदानंद मोरे, डॉ. अक्षयकुमार काळे आणि श्रीपाल सबनीसांसारख्या संमेलनाध्यक्षांनी किती नवीन लेखक घडविले याचाही विचार होणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट क्षेत्राचा टच लेखन क्षेत्रातही आला पाहिजे अशी गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली. या सगळ्या आव्हानांना सामोरे जात लेखकांनी लिहिलेच पाहिजे. कारण न लिहिणे हा गुन्हा आहे, असे पाटील यांनी सांगितले.

चंद्रपूर येथील कवी प्रशांत आर्वे यांनी सांगितले की, मोबाईल, व्हॉट्सऍप आणि फेसबुकने संवाद हिरावून घेतला आहे. पण आजच्या लेखकांना याची जाणीव नाही. संवाद नसल्याने चिंतनशक्ती हरवत चालली आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. विरोधाला विरोध करणे हे चुकीचेच आहे. जेव्हा आपण नथुरामी भूमिकेला विरोध करतो तेव्हा ब्रिगेडी भूमिकेलाही विरोध केला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts: