|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास 10 रोजी प्रारंभ

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास 10 रोजी प्रारंभ 

वार्ताहर/ सोलापूर

प्रिसीजन फौंऊडेशनच्यावतीने येत्या 10 ते 12 रोजी दरम्यान सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेडरेशनच्या सहकार्याने आयोजीत या पहिल्या महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूरकरांना विविध देशांमधील दर्जेदार चित्रपट पाहता येणार आहेत.अशी माहिती सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन तथा प्रिसीजन फौंऊडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

   भागवत उमा मंदिर आणि प्रभात टॉकीज या दोन चित्रपटगृहांमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी उमा मंदिर येथे होणार असून या महोत्सवास अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. यावेळी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. 11 आणि 12 पेब्रुवारी हे दोन दिवस सिनेरसिकांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आनंद लुटता येणार आहे. हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात भागवत उमा मंदिर आणि प्रभात टॉकीज यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असे यतिन शहा यांनी सांगितले.

सोलापूरातील चित्रपट चाहत्यांना विविध भाषा आणि विविध देशांतील कलाकृतींचाही आस्वाद घेता यावा या उद्देशानेच प्रिसीजन समुहाने हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यावा हे सांगण्यासाठी प्रिसीजन फौंदेशनने नोव्हेंबरमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळा आयोजित केली होती, त्याला सोलापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. या कार्यशाळेत डॉ. समर नखाते, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मार्गदर्शन केले होते. यावेळी सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले होते.

या देशांमधील कलाकृतींचा समावेश

सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकुण 21 चित्रपट दाखविले जाणार आहेत. भारतासह बेल्जियम, फ्रान्स, जॉर्जिया, दक्षिण आफ्रिका, चीन, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रिया, अमेरिका, पोलंड, रशिया, जर्मनी, इटली, कॅनडा अशा अनेक देशांमधील कलाकृतींचा समावेश आहे.

चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदी

सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नाव नोंदणी आवश्यक असून या महोत्सवाचा लाभ 18 वर्षे वयापुढील रसिकांनाच घेता येणार आहे. त्यासाठी भागवत उमा मंदिर, प्रभात टॉकीज, एस के कॉम्प्यूटरर्स, इंप्रेशन आणि कॉटनकिंग, प्रीती केटरर्स, विद्या कॉम्प्युटरर्स, द फिश मार्केट या ठिकाणी नाव नोंदणी करता येऊ शकते.

या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे सोलापूरला सांस्कृतिकदृष्टय़ा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या महोत्सवास सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन यतिन शहा व डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. यावेळी भरत भागवत, आण्णासाहेब पाटील, दीपक पाटील उपस्थिती होते.

Related posts: