|Friday, January 24, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एकाकी निरुपम यांना आधार

एकाकी निरुपम यांना आधार 

काल-परवापर्यंत प्रचारात एकटे वाटणारे काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांना मालवणी येथील सभेच्या निमित्ताने आधार मिळाल्यासारखे झाले आहे. गटबाजी करून, सेनेशी हातमिळवणीने मुंबईत उमेदवाऱया दिल्या असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे निरुपम एकटे पडले होते. कालच्या सभेतील माजी खासदार एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, माजी पेंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, आमदार अस्लम शेख, प्रवक्ते सचिन सावंत यांच्या उपस्थितीने यापुढील मुंबई मनपा निवडणुकीच्या काँग्रेसच्या प्रचारकार्याचा अंदाज मात्र आतापासूनच येऊ लागला आहे.

‘काँग्रेस म्हणजे एक कुटुंब असून भारतातील तो राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते, आणि चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निवडणुकीत एखाद्या नेत्याच्या निकटवर्तीयाला तिकीट न मिळाल्याची घटना होऊ शकते. त्यातून भांडणेही होऊ शकतात. ही भांडणे कुटुंबातील भांडणाप्रमाणे आहेत. मात्र, गटबाजी नाही. आम्ही सर्व एकच आहोत’  असे मालवणी येथील म्हाडा मैदानावर काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटत असतानाच काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी सांगितले. सर्वांची भाषणे संपल्यावर साखळी करून त्यांनी एकजुटीचा नमुना मुंबईकरांसमोर पेश केला. त्यामुळे अगदीच कोणाच्या नाही, मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मात्र जीवात जीव आला असेल.

संजय निरुमप यांची इतपत मनःस्थिती सांगण्याचे कारण म्हणजे त्यांच्या एकाधिकारशाही आणि मनमानीचाच बागुलबुवा काही काँग्रेस पदाधिकाऱयांनी प्रसारमाध्यमांमध्ये पसरवला होता. ज्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही, किंवा ज्या नेत्यांच्या निकटवर्तीयांना डावलले गेले असे काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी निरुपम यांच्या एकाधिकारशाही विरोधात शंख पुकारला. मुंबई काँग्रेस बुडवायला निघालेत निरुपम या आरोपाचे पुरावे देखील सर्वांसमोर तेवढय़ाच प्रकर्षाने समोर येत होते. त्यामुळे काँग्रेस विरोधातील पक्ष देखील निरुपमांच्या प्रत्येक उमेदवार निवडीवर लक्ष ठेवून होते. मुंबई महानगरपालिका कार्यक्रम आणि पुढे उमेदवार निवडीची यादी जाहीर झाल्यावर निरुपमांच्या हालचालींवर तर स्वपक्षातील नेत्यांसह विरोधकांचेही बारीक लक्ष होते. कोणत्या वॉर्डात कोणाला उमेदवारी दिली आहे, उमेदवार तगडा आहे की, यथातथाच, कोण कोणती मते खाईल किंवा काँग्रेसने खाल्लेली मते कोणत्या पक्षाला पोषक राहतील, यासारख्या असंख्य मुद्यांवर अभ्यास केला जात होता. त्यामुळेच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस-शिवसेना छुपी युती असल्याचा आरोप केला आहे.

शेलार यांच्या या आरोपात तथ्य असल्यास कृपाशंकर सिंह, नसीम खान, नारायण राणे आणि गुरुदास कामतही सेनेसाठी फॉर असल्यानेच प्रचारापासून दूर आहेत. असाही आरोप येत्या काही दिवसात विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. मुळात गेल्या जूनपासून सुरू झालेला निरुपम-कामत गटबाजीला निवडणुकीच्या वेळीच तोंड फुटले. कामतांनी निवडणूक प्रचारापासून दूर राहणार असल्याचे घोषित केल्यानंतर त्यापाठोपाठ कृपाशंकर सिंह, नसीम खान आणि नारायण राणे यांनी देखील मुंबईतील प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचे ठरवल्यावर निवडणुकीतील काँग्रेसचे चित्र कसे असेल याची चिंता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून निरुपमांना आहे.

मालवणीतील काँग्रेसच्या पहिल्याच प्रचार सभेत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, मोहन प्रकाश, आमदार अस्लम शेख, हज कमिटीचे सदस्य आदी नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम निरुपम यांनी त्या दिवशी केले. मुंबईकरांना देण्यात येणाऱया सुविधांबाबतचा व्हिजन डॉक्युमेंट याच सभेत प्रकाशित करण्यात आला. या व्हिजन डक्युमेंटसाठी काँग्रेस किती दिवसापासून आणि कसे काम करत होती याबाबत प्रिया दत्त यांनी याच सभेत सांगितले. त्यामुळे निवडणुकीच्या कामात एकसंधता असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

निरुपम सुसाट

निरुपम यांच्या मनमानीबाबत गुरुदास कामत यांनी पहिल्यांदा आवाज उठवला. त्यावर दिल्लीतून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समज देण्यात आली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी देखील एका वरिष्ठ नेत्याला चांगलीच समज दिल्याचे दादरच्या टिळक भवनातून समजते. त्यानंतर निरुपम सुसाट सुटले. त्यामुळे ही चांगली समज कोणाला दिली याचे आकलन मुंबईतील सर्व काँग्रेस नेत्यांना झाले आहे. नारायण राणे, कृपाशंकरसिंह, नसीम खान यांना हुड्डा यांनी समज दिल्यानंतर प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मिलेनियम हॉटेलमध्येही नसीम खान समर्थक आणि निरुपम यांच्यात भूपेंद्रसिंह हुड्डा समोर तिकीट मिळण्यावरून बाचाबाची झाली. मात्र, त्या बैठकीनंतरही काँग्रेसच्या उमेदवार यादीला स्थगिती न देता कायम ठेवण्यात आली. फक्त दोन उमेदवारांची नावे बदलण्यात आली. त्यातही खान समर्थकांचा दुरान्वये संबंध येत नाही. उमेदवारांची नावे सर्वानुमते आणि जिंकण्याच्या उद्देशाने निवडण्यात आली असल्याचे रविवारच्या सभेत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी सांगितले. उमेदवार निवड सर्वानुमते असल्याची शाश्वती निरुपमांना सर्वांसमोर मिळाली असल्याने यापुढील काँग्रेसमध्ये जान येईल.

काल-परवापर्यंत प्रचारात अगदीच एकटे वाटणारे संजय निरुपम यांना या सभेच्या निमित्ताने आधार मिळाल्यासारखे आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेसचे चित्राचा अंदाज येत नाही. पण, या पुढील निवडणुकीच्या काँग्रेसच्या प्रचारकार्याचा अंदाज मात्र आतापासूनच येऊ लागला आहे.

Related posts: