|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शिवसेनेत महिलांचा सन्मान नाही

शिवसेनेत महिलांचा सन्मान नाही 

जितेंद्र आव्हाड यांची टीका

ठाणे / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यकारभार चालविणाऱया शिवसेना पक्षाला महिलांचा सन्मान करता येत नसेल, निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या पतीला पत्नीने प्रश्न विचारला म्हणून तिच्या डोक्यात नारळ फेकून मारला जात असेल तिथे सामान्य महिला सुरक्षित राहतील का? असा सवाल सवाल उपस्थित करून शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी बदलून ती नारळच करायला हवी, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच महिलांचा अवमान करणाऱया शिवसेनेच्या हातात महिलांनी या निवडणुकीत कायमचा नारळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ठाण्यातील शिवसेनेच्या 25 वर्षांच्या कामाचा पंचनामा करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेने एकेका घरातील चार चार व्यक्तींना उमेदवाऱया देऊन कट्टर सैनिकांना वाऱयावर सोडण्याचे काम केले आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला. ठाण्यातील पाणी नियोजनाचा सत्ताधाऱयांनी बोजवारा उडविला असून 25 वर्षात ठाणेकरांना 3 हजार 500 कोटी रुपयांचा चुराडा केला आहे, असा आरोप ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 20 लाखांहून अधिक लोकसंख्या असून सेनेने पाण्याच्या नावावर या नागरिकांचा खिसा कापण्याचे काम केले आहे. एवढी लोकसंख्या असतानाही पालिका फक्त एक लाख 56 हजार कुटुंब आणि 6 हजार व्यावसायिकांना पाण्याची जोडणी देऊ शकली आहे. पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरींपैकी केवळ 220 विहिरीच शिल्लक आहेत. 450 कोटींचे शाई धरण 1400 ते 1500 कोटींवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे पाण्याच्या नावावर ठाणे पालिकेची सत्ता भोगणाऱया शिवसेनेने ठाणेकरांची लूट केली आहे, असा आरोप परांजपे यांनी केला.

नारळ निशाणी द्या !

वागळे इस्टेट येथील शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील यांनी त्यांच्या नगरसेवक पत्नीच्या डोक्यात प्रचाराचा नारळ फेकून मारला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या नगरसेविकेने केवळ पतीला प्रश्न विचारला म्हणून त्याने हे कृत्य केले. त्यामुळे महिलांचा अवमान करणारा शिवसेनेचा उमेदवार असणे ही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करणाऱया सेनेची संस्कृती म्हणायची का? असा सवाल उपस्थित करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा उमेदवारांना जनतेवर लादू नये. असे आवाहनही आमदार आव्हाड यांनी केले. तर अशा पक्षाची निशाणी बदलून ती नारळ ठेवायला हवी अशी सूचनाही त्यांनी केली.

Related posts: