|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा क्रांती मोर्चाला वाढता पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाला वाढता पाठिंबा 

प्रतिनिधी / बेळगाव

मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चाला विविध समाजांचा जाहीर पाठिंबा मिळत असून, 16 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱया मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार सर्वत्र करण्यात येत आहे.

कडोलकर गल्ली येथे मंगळवारी सायंकाळी जनजागृतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गल्लीतील पंच मंडळ, नागरिक व महिलामंडळांतर्फे मोर्चामध्ये प्रचंड संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना गुणवंत पाटील यांनी हा मोर्चा महाराष्ट्रातील क्रांती मोर्चांपेक्षा अगळावेगळा ठरणार असून, आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन आपण मोर्चा काढणार आहोत. आपली संस्कृतीही आपल्या भाषेवर टिकून असते. संवादाचे माध्यमही भाषा असते. सीमाप्रश्नासाठी 60 वर्षे मराठी माणूस लढतो आहे. जगात असा दुसरा लढा नसून, महाराष्ट्रापेक्षा सीमाभागातील जनता मराठी भाषेवर अधिक प्रेम करते.

प्रशासनाचा मोर्चाला पाठिंबा

मराठी भाषिकांची एकी पाहून प्रशासनाने मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे 16 तारखेला आपली ताकद दाखवून आपली संस्कृती टिकविण्याचे महान कार्य करूया असे ते म्हणाले.

माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, 16 तारखेला मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आपण जास्तीत जास्त प्रचारावर भर दिला पाहिजे. कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर मराठा समाजाला दडपण्याचा प्रयत्न झाला. आणि येथूनच मराठा समाज पेटून उठला आहे. सर्वानी सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा असे ते म्हणाले. अनंत देसाई यांनी प्रास्तावीक करून मोर्चाचा उद्देश सांगितला. यावेळी विनायक कडोलकर, विनायक चव्हाण, अनंत खन्नूकर, अजित जाधव, विश्वनाथ मुचंडी, मारूती बाडीवाले, राम कडोलकर, सागर हुंदरे, दीपक गायकवाड, सागर कडोलकर, मदन पाटील, सुधीर बाडीवाले, पी. आर. मांजरेकर, भाऊ बाडीवाले आदी उपस्थित होते.

नामदेव दैवकी समाज

नामदेव दैवकी संस्थेच्यावतीने गुरुवारी निघणाऱया मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मंगळवारी संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी राम हवळ होते. यावेळी त्यांनी प्रत्येकाने मोर्चाबाबत जनजागृती करावी आणि अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. उपाध्यक्ष नारायण काकडे, दिपक खटावकर, विठ्ठल काकडे, द्वारकानाथ उरणकर, सुनील कोरडे, शशीकांत हवळ, अजित कोकणे, भाऊ मुसळे, रोहण उरणकर, अशोक रेळेकर, सुरेश औंधकर, संतीश उंडाळे, विलास खटावकर, लीलावती रेळेकर आदी उपस्थित होते.

Related posts: