|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोर्चासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी

मोर्चासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी 

प्रतिनिधी / बेळगाव

सीमाप्रश्नाची सोडवणूक, मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी काढण्यात येणारा मराठा आणि मराठी भाषिक मूक क्रांती मोर्चा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोर्चाच्या तयारीने वेग घेतला असून बेळगाव जिह्यासह कोल्हापूर, सांगली जिह्याच्या कानाकोपऱयातून मराठी भाषिक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बेळगावातील आजवरचा हा सर्वात मोठा मोर्चा ठरणार आहे. मोर्चाच्या दिवशी संपूर्ण शहरातील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळा-महाविद्यालयानी सुटी देण्याचा विचार सुरू केला आहे.

मराठा समाजावर सातत्याने होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात  मराठी क्रांती मोर्चे काढण्यात आले. त्याचप्रमाणे गुरुवारी मराठी भाषिकांच्या, मराठा समाजाच्या, शेतकऱयांच्या व कष्टकरी वर्गाच्या विविध समस्या घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार शहराच्या विविध भागातून व्यक्त होत आहे. मोर्चामध्ये सहभागी होणाऱया नागरिकांच्या स्वागतासाठी शहरात 13 ते 14 ठिकाणी स्वागत कमान उभारण्यात येणार आहेत. या स्वागत कमानींना विविध राष्ट्रपुरूषांची नावे देण्यात येणार असून, स्वागत कमानी उभारण्यास मंगळवार दि. 14 पासून सुरुवात होणार आहे.

ठिकठिकाणी पार्किंगची सोय

लाखोंच्या संख्येने नागरिक मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याने पार्किंगची व्यवस्था करण्यात येत असून सकल मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी सोमवारी पोलीस आयुक्त व पोलीस अधिकाऱयांची भेट घेतली व ठिकठिकाणी करण्यात आलेल्या पार्किंगच्या सोयीबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी आयुक्त पी. जी. कृष्णभट्ट यांनी पोलीस अधिकारी पार्किंग स्थळांची पाहणी करतील, असे सांगितले. मंगळवारी पोलीस अधिकारी संयोजकांनी दिलेल्या पार्किंग स्थळांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पार्किंगबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भव्य व्यासपीठ उभारणार

मोर्चाच्या मार्गांवर ठिकठिकाणी विविध संघटनांकडून पाणी, अल्पोपहार आदींची सोय करण्यात येणार आहे. याबाबतची तयारीही सुरू करण्यात आली आहे. शिवाय मोर्चा सुरू होणाऱया शिवाजी उद्यानजवळ आणि मोर्चाची सांगता होणाऱया ध. संभाजी चौक येथेही भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. मोर्चामध्ये मराठा समाजातील आणि मराठी भाषिकांच्या शिक्षण संस्था, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी आदींनी आपापले व्यवसाय बंद ठेवून मार्चात सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने संयोजकानीही प्रयत्न सुरु केले आहेत.

क्रांती मोर्चासाठी आवश्यक असणारे टी-शर्ट व भगव्या टोप्या, भगवे ध्वज खरेदीसाठी सर्वत्र मोठी गर्दी होऊ लागली आहे. युवावर्ग आणि विद्यार्थी व युवती यांच्यामध्ये उत्साह दिसून येत असून शहरात अनेक ठिकाणी विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याठिकाणी सकाळपासूनच साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. 70 रुपयापासून ते 120 रुपयांपर्यंत टी-शर्ट उपलब्ध असून, भगवे ध्वज आणि टोप्यांची मागणीही वाढली आहे. मोर्चाला दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने बुधवार दि. 15 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वती तयारी करण्यात येणार आहे.

स्वयंसेवकांची बैठक आज

मोर्चाला शिस्त लावण्याची जबाबदारी स्वयंसेवकांवर असणार असून, स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सूचना करण्यासाठी मंगळवार दि. 14 रोजी सायंकाळी 4.30 वाजता ओरिएंटल शाळा येथे स्वयंसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली आहे. ज्या स्वयंसेवकांनी नावे नोंदविली आहेत. त्या स्वयंसेवकांनी वेळेवर बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांची आज व्यापक बैठक

मराठा क्रांती मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोलाचा असणार आहे. याबाबत सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महापौर सरिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 14 रोजी सायंकाळी 4 वाजता ओरिएंटल शाळेजवळील तुकाराम महाराज सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शहरातील सर्व महिला मंडळ पदाधिकारी, महिला व युवतीनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवारी शहरातील विविध पुतळ्यांची पूजा-अर्चा

बुधवार दि. 15 रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांतर्फे आणि नागरिकांतर्फे शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची पूजा करण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, संगोळ्ळी रायण्णा, वीर राणी कित्तूर चन्नम्मा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

चौकट                 विविध संस्थांना आवाहन

बेळगाव शहरातील सहकारी संस्था, सहकारी बँका, शिवजयंती उत्सव मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, मंदिर ट्रस्ट कमिटी, स्वसहाय्य संस्था, व्यापारी बंधू, पारायण मंडळे, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, साप्ताहीक फंड, शैक्षणिक संस्था, ग्रामीण भागातील विविध संस्था यांनी मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related posts: