|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » फोंडाघाटला काँग्रेसचा विजय मोठय़ा मताधिक्क्याचा!

फोंडाघाटला काँग्रेसचा विजय मोठय़ा मताधिक्क्याचा! 

कणकवली : फोंडाघाटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता, असे वाटते की येथील जि. प. व दोन्ही पंचायत समित्यांच्या जागा मोठय़ा मताधिक्क्याने ताब्यात घेण्याचा निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याने केला आहे. जिल्हय़ातील 50 जि. प.मध्ये पहिल्या तीन क्रमांकात फोंडाघाट जि. प.चा निकाल असणार आहे, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी फोंडाघाट परिसरात काढण्यात आलेल्या फेरीलाही मोठा प्रतिसाद लाभला.

फोंडाघाट जि. प. मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी  राणे बोलत होते. यावेळी फोंडाघाट जि. प.चे उमेदवार संजय आंग्रेs, फोंडाघाट पंचायत समिती उमेदवार सुजाता सदानंद हळदिवे, लोरे पं. स.चे उमेदवार मनोज तुळशिदास रावराणे, ‘नकुशी’ व ‘माझे मन तुझे झाले’ मालिकाफेम अमृता सकपाळ-रावराणे, ‘दुनियादारी’ फेम प्रणव रावराणे, माजी पं. स. उपसभापती संतोष कानडे, जि. प. माजी उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर, बबन हळदिवे, संतोष आंग्रे, विश्वनाथ जाधव, शहराध्यक्ष राजेश शिरोडकर, उद्योगपती नामदेव मराठे, राजू पटेल, वाघेरी सरपंच संतोष रावराणे, सुनील लाड, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुमेधा पाताडे, सौ. मेघा गांगण, सौ. माधवी दळवी, सौ. कोरगावकर आदी उपस्थित होते.

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पाठिशी येथील जनता गेली 20 वर्षे खंबीरपणे उभी आहे. एवढी वर्षे जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असतानाही विरोधक भ्रष्टाचाराचा एकही आरोप करू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी जिल्हा परिषद किती पारदर्शक काम करते, याचे उत्तम उदाहरण यानिमित्ताने जनतेसमोर आले आहे. त्यामुळे 23 तारीखला आमचा विजय निश्चित असल्याचे राणे म्हणाले.

संजय आंग्रे म्हणाले, प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता, काँग्रेसचा विजय हा बहुमताने असणार याची खात्री आहे. यानिमित्ताने फोंडाघाट बाजारपेठेत प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीला कार्यकर्ते उत्साहाने व मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. फोंडाघाटसह लोरे, वाघेरी, पियाळी, घोणसरी आदी भागातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.