|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कुणाची शंभरी भरणार?

कुणाची शंभरी भरणार? 

(झिरो नंबरचा चष्मा)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले पक्ष बहुमताचा दावा करत आहेत. यंदा मुंबईत शिवसेना आणि भाजपची मुख्य लढत सरळ सरळ दिसते आहे. या लढतीत सगळय़ांचे लक्ष लागले आहे ते याकडे की कोण 100 जागांचा पल्ला गाठू शकेल? शिवसेनेने 227 जागांवर धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवार उतरवले आहेत. तर भाजप, रासप, शिवसंग्राम आणि रिपाइंची आघाडी मिळून 227 जागा लढत आहे. पर्यायाने सर्व 227 जागांवर भाजपचे कमळ चिन्ह नाही.

प्राप्त परिस्थितीत शिवसेनेने युती तोडली आणि प्रचाराचा पहिला गिअर टाकला. यात त्यांनी ही निवडणूक स्थानिक मुद्दय़ांपासून पूर्णपणे दूर नेण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेला महानगरपालिकेच्या कामावर, मग ती केलेली असोत की न झालेली बोलायचे आहे. घटस्फोट झालेल्या नवरा-बायकोत जसे सर्वाधिक काळ एकमेकांची उणीदुणी काढायला वेळ घालवला जातो तशाच पद्धतीने शिवसेनेचे प्रचार पॅम्पेन सुरू आहे. शिवसेनेने ही निवडणूक जणू काही महानगरपालिकेची नसून लोकसभेची निवडणूक आहे अशीच भूमिका घेतली आहे. लोकसभेचे मुद्दे आणि भाजपसह मोदींवर टीका करण्यात उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्धाअधिक वेळ खर्ची होतोय. मोदी, शहा, भाजप यावर बोलताना मर्दाची अवलाद, अंगार, याद राखा, भस्मसात व्हाल, मुळावर आले तर मुळासकट उपटा असे त्यांचे नेहमीचे शब्द ते रोज दोनदा होणाऱया सभेत वारंवार वापरत आहेत. यू टय़ूबवर जर उद्धव ठाकरेंची भाषणे कुणी काही दिवसांनी ऐकली तर एकच भाषण परत परत ऐकल्याचा अनुभव श्रोत्यांना मिळेल, इतके रोजचे भाषण एकसुरी झाले आहे. मुंबई मनपाच्या गेल्या 3 वर्षाच्या जाहीरनाम्यातल्या अपूर्ण बाबींवर ते बोलायला तयार दिसत नाहीएत. काहीही करून 2017ची मनपा निवडणूक भावनिक करायचीच असा चंग त्यांनी बांधलाय.

त्यांच्याकडून बोलल्या गेलेल्या वक्तव्यांची दखल माध्यमात घेतली जाते आहे, कारण तुलनेने भाजपकडून निवडणुकीला आठवडा राहिला तरी म्हणावा तसा जोर लावला गेलेला नाही. भाजप शिवसेनेला आपल्या अजेंडय़ावर आणू पाहतोय. पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या टेंडर प्रणालीत ठाकरे कुटुंबाचा इंट्रेस्ट दडलाय हे भाजपकडून जोरात सांगितले जात आहे. भाजपच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रमुख चेहरा आहे. नगर परिषद आणि पंचायत समित्यात मिळालेल्या यशानंतर भाजपने परत एकदा शहरी वातावरणात होत असलेल्या निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांच्याच चेहऱयाचा वापर करायचे ठरवले आहे व ते ही आपल्या प्रतिमेवर उदार होऊन लढत आहेत. शिवसेनेच्या भावनिक मुद्दय़ांना बळी पडून कोणी काही बोलून नसता वाद निर्माण करू नये याची पक्की खबरदारी भाजपने घेतली आहे. हेतू इतकाच की ऐनवेळी घात होऊ नये.

तर ही इतकी लांब प्रस्तावना होती ती केवळ एकाच मुद्दय़ासाठी की, मुंबई महानगरपालिकेच्या `त्या’ 100 जागांना आपापल्या पदरात टाकण्यासाठी काय व्यूहरचना आखली गेली आहे ते समजावे म्हणून. त्या 100 जागा कुठल्या? असा स्वाभाविक सवाल आता येऊ शकतो. तर त्या आहेत विरोधकांच्या जागा. आताच्या माझ्या अंदाजानुसार शिवसेना-भाजप 70 ते 80 जागांच्या दरम्यान आहेत. शिवसेना आपल्या 76 जागा राखून त्यावर काही जागा जास्त मिळवताना दिसत आहे. तर भाजप मुंबईच्या बदललेल्या सामाजिक स्थितीत आपले संख्याबळ दुपट्टीपेक्षा जास्त करायच्या प्रयत्नात दिसतो आहे. मात्र, या दोन्ही पक्षांना आपल्या खात्यात तिहेरी आकडय़ाचे यश संपादन करायला खूप जोर लावायला लागतोय. म्हणूनच त्यांची भिस्त आहे ती विरोधकांच्या जागांवर. राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष या निवडणुकीत सेना आणि भाजप दोघांकडूनही भक्षस्थानी ठेवला गेलाय. मनसेच्या प्रचाराला झालेला उशीर, पक्षाकडे कमी झालेली कार्यकर्त्यांची फळी आणि दुसऱया फळीच्या नेतफत्वाची झालेली वाताहत ही इतर पक्षांना आशेचा किरण दाखवत आहे. मनसेच्या 28 जागा आहेत. त्यातल्या बहुसंख्य जागांवर शिवसेनेचे स्वतःचे मतदान आहे. हे मतदान शिवसेनेच्या भावनिक प्रचाराला बळी पडत मनसेकडून निसटल्याचे चित्र आज दिसत आहे. तर, मनसेला विजयासाठी लागणारा मतांचा कोटा 5 वर्षापूर्वी भाजपकडून फुटून निघाला होता. तो ही भाजपकडे वळू पाहतोय. अशा स्थितीत जागांच्या स्पर्धेत पुढे सरकायला मनसेची भूमी सेना-भाजपला अधिक मऊ लागत आहे.

मनसेप्रमाणे मुंबईत काँग्रेस पक्ष अंतर्गत आवाहनांचा सामना करतो आहे. या पक्षाची मतपेढी आहे मुंबईतल्या दलित-मुस्लीम मतांची. यातल्या दलित मतांवर भाजपने आपला जोर लावला आहे. मराठा आंदोलनात काँग्रेस नेत्यांचे सहभागी होणे, ऍट्रॉसिटी कायद्याला रद्द करण्याची मराठा समाजाची मागणी तात्काळ न फेटाळणे या बाबी काँग्रेसच्या विरोधात गेल्या आहेत. तर भाजपकडून मुख्यमंत्री या पदावरून ऍट्रॉसिटी रद्द होणार नाही ही दिलेली ग्वाही दलित मतांची बेगमी करायला वापरली जातेय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा ही भाजपच्या प्रचारातला मुद्दा दलित मतांना स्वतःकडे खेचायला वापरला जातो आहे. शिवसेनेकडे दलितातील चर्मकार समाज पूर्वीपासून वळला आहे. तो टिकवून ठेवण्याची लढाई ते लढत आहेत.

मुस्लीम मतांची वोटबँक राखत असताना काँग्रेसला एमआयएम आणि सपाचे आवाहन सोसावे लागते आहे. एमआयएमचा अतिशय नियोजनबद्ध आणि पूर्णपणे शांततेत सुरू असलेला प्रचार काँग्रेसच्या काळजाचा ठाव चुकवून गेलाय. मुस्लीम मतांमधली फूट म्हणूनच त्यांना परवडणारी नाही. विद्यमान बलाबलानुसार काँग्रेसच्या 51 जागा आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच यंदा 20 ते 25 पुढे आपला पक्ष जाऊ शकेल असे वाटत नाहीए.

शिवसेनेशी साटंलोटं करून शरद पवार यांनी मुंबईत आपला पक्ष वाढू दिलेला नाही. त्याची किंमत मुंबई राष्ट्रवादी पक्षाने कायम चुकवली. या पक्षाचं मुंबई कार्यालयही फार थोडय़ा जणांना ठाऊक असेल. हीच त्या पक्षाच्या ताकदीची मर्यादा आहे. त्यातच मुंबई राष्ट्रवादीत सचिन अहिर विरुद्ध इतर आणि ताई गट विरुद्ध दादा गट असे वेगवेगळे संघर्ष राष्ट्रवादीत आहेत. मुंबईभर अपील असलेला चेहरा नसणे आणि शरद पवार यांच्या प्रतिमेची मुंबईकरांना असलेली ऍलर्जी या बाबी एनसीपीला मुंबईत कायम अडचणीच्या ठरल्या आहेत. आता या पक्षाचे बीएमसीत 14 नगरसेवक आहेत, निकालानंतर हा आकडा एकेरी राहतो की काय? अशी शंका त्यांच्या नेतफत्वालाही आली असेल.

इतर या श्रेणीतले 26 नगरसेवक एव्हाना विविध चिन्हं घेऊन मैदानात उतरले आहेत किंवा इथे तिथे गुळपिट जमवून आपलं भवितव्य मजबूत करू पाहत आहेत. अशा स्थितीत गेल्या निवडणुकीत न मिळालेल्या 119 जागांसाठी शिवसेना आणि भाजप या मुख्य प्रतिस्पर्ध्यांची लढाई सुरू आहे. यातल्या 19 जागा विरोधकांसाठी सोडल्या तर उरलेल्या 100 जागांमधील सर्वाधिक हिस्सा आपल्या पदरात पडावा याचा संघर्ष शेवटच्या 5 दिवसात अधिक तीव्र झालेला दिसेल. यात विरोधकांची शंभरी भरवत जो स्वतः शंभर जागांच्या सर्वात आधी जवळ जाईल, जो त्यात जिंकेल त्याचा पुढला महापौर असेल हे नक्की.

प्रसाद काथे