|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देव रामेश्वर चालले शिवरायांच्या भेटीला

देव रामेश्वर चालले शिवरायांच्या भेटीला 

मालवण : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळय़ासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह किल्ले सिंधुदुर्ग येथे 17 फेब्रुवारी रोजी रवाना होणार आहेत. या ऐतिहासिक देदीप्यमान भेट सोहळय़ात असंख्य भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

हिंदवी स्वराज्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैनिकी आरमार मजबूत व भक्कम करण्याच्यादृष्टीने पावले उचलली होती. यासाठी त्यांनी अनेक किल्ल्यांवर स्वाऱया करून ते आपल्या ताब्यात घेतले होते. आरमाराच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरेल, अशा अलिबाग येथील मुरुड-जंजिरा किल्ल्यावर त्यांनी स्वारी केली. मात्र, त्यांना अपयश आले. एकदा तर त्यांनी स्वतः किल्ल्यावर चाल केली होती. एकूण पाच स्वाऱया करूनही जंजिरा छत्रपतींच्या ताब्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना त्याचे शल्य कायम होते. यामुळे त्यांनी आपल्या आरमारात प्रति जंजिरा असावा, यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी यानिमित्ताने पश्चिम किनारपट्टीवर भेट देण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांना मालवण समुद्रातील कुरटे बेट दिसून आले. त्यावेळी त्यांनी याचठिकाणी प्रतिजंजिरा व त्याहूनही अधिक भक्कम किल्ला उभारण्याचे ठरविले. सुमारे 48 एकर परिसरात किल्ला बांधण्यासाठी त्यांनी मोरयाचा धोंडा येथे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. त्यासाठी लागणारा काळा दगड कोल्हापूर येथून उंट, खेचर, घोडे यांच्या पाठिवरून वाहतूक करून आणण्यात आला. बांधकामाला चुना आणि सिसे यांचे मिश्रण लावण्याचे ठरले होते.

दरम्यानच्या काळात कुरटे बेटावर बसविण्यात येणारा दगड समुद्राच्या लाटांपुढे टिकत नव्हता. यात अनेक दिवस लोटू लागले. त्यामुळे छत्रपती चिंतातूर बनले. त्यावेळी छत्रपतींना दृष्टांत झाला. या दृष्टांतात कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर छत्रपतींसमोर एका सत्पुरुषाच्या रुपात उभे राहून म्हणाले, राजे तुम्ही घाबरू नका, तुमची चिंता दूर होईल. पण, प्रथम तुम्ही एक गोष्ट करा, येथून जवळच उत्तरेच्या बाजूला माझे स्वयंभू शिवलिंग आहे. तेथे तुम्ही जा व त्याचा प्रथम जीर्णोद्धार करा. नंतर किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ करा. तुमची मनोकामना पूर्ण होईल,’ या दृष्टांताने छत्रपती जागे झाले. त्यांनी सरळ उत्तरेकडील कांदळगावचा मार्ग धरला. तेथे येऊन शिवलिंगाची पूजा-अर्चा केली व त्याठिकाणी एका दिवसातच आकर्षक घुमट उभारला. त्यानंतर छत्रपतींनी श्री देव रामेश्वराकडे किल्ला बांधून पूर्ण होऊ दे, असे सांगणे केले. आठवण म्हणून घुमटाच्या समोरच वटवृक्षाचे झाड लावले. आजही तो वटवृक्ष ‘छत्रपतींचा वड’ म्हणून दिमाखात उभा आहे. त्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात दगड समुदात टिकू लागला आणि किल्ल्याचे बांधकाम पूर्णत्वास जाऊ लागले. यामुळेच हा भेट सोहळा आयोजित केला जात आहे.

नजराणा देऊन भेट सोहळा

श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी सकपाळ कुटुंबिय यांच्याकडून स्वागत केले जाते. त्यानंतर छत्रपतींकडून शेले-पागोटे देऊन श्री देव रामेश्वराला नजराणा दिला जातो. याप्रसंगी सर्व वारेसुत्रांचाही सन्मान केला जातो. देव रामेश्वर आपल्यावतीने छत्रपतींना शेले-पागोटे देऊन सन्मानित करतात. नंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र व भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद आदान-प्रदान करतात.

या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळय़ात कांदळगावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील भाविक असंख्य संख्येने सहभागी होतात. देव रामेश्वर जाणाऱया मार्गावर ठिकठिकाणी सडारांगोळी, तोरणे, स्वागत कमानी, आकर्षक देखावे साकारले जातात. हा भेट सोहळा म्हणजे तालुक्यादृष्टीने एक सणच असतो. श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे सर्व भाविकांचे स्वागत करून या सोहळय़ासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

                         असा रंगणार भेट सोहळा

17 रोजी सकाळी नऊ वाजता श्री देव रामेश्वराचे आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह मालवणकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जोशीमांड (मेढा) येथे प्रस्थान, अल्पोपहार, दुपारी 12.30 वा. समुद्रमार्गे किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रयाण. नंतर देव रामेश्वर, शिवाजी महाराज, आदिमाया भवानी माता यांची ऐतिहासिक भेट व प्रस्थान. सायंकाळी चार वा. देव दांडेश्वर मंदिर (दांडी) येथे भेट, रात्री मौनीनाथ मंदिर (मेढा) येथे भेट, महाप्रसाद व मुक्काम.

18 रोजी सकाळी आठ वा. कुशेवाडा (मेढा) येथे पारंपरिक भेट, 10 वा. रामेश्वर मांड (बाजारपेठ) येथे भाविकांना दर्शन देण्यासाठी थांबणार. तेथे रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसाद, चार वा. रामेश्वर मांड येथून कांदळगाव येथे प्रयाण. रात्री नऊ वा. रामेश्वर मंदिर येथे आगमन व समारोप.

Related posts: