|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » विकासकामाचे श्रेय एकटय़ा काँग्रेसचे नाही

विकासकामाचे श्रेय एकटय़ा काँग्रेसचे नाही 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या शिवसेनेकडून काँग्रेसने केलेल्या कामाची स्तुती सुरू आहे. ही स्तुती कशासाठी ते मला माहीत नाही. मात्र, गेली 15 वर्ष राज्यात जे काँग्रेस आघाडीचे सरकार होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा महत्त्वाचा भागिदार होता. पायाभूत विकासाशी संबंधित महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात जे विकासाचे प्रकल्प उभे राहिले त्याचे श्रेय एकटय़ा काँग्रेसला नाही. विकासकामात राष्ट्रवादी काँग्रेसचेही योगदान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी `तरुण भारत संवाद’शी बोलताना स्पष्ट केले. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्याशी केलेली बातचित…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विकासकामांचे श्रेय सध्या काँग्रेसला देत आहेत. हे श्रेय देताना ते राष्ट्रवादीचे नाव सुद्धा घेत नाहीत

गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडीच्या सरकारमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा या आघाडी सरकारने उभ्या केल्या आहेत. राष्ट्रवादीचा त्यात अत्यंत सक्रिय सहभाग होता. अर्थ खात्यासह पायाभूत सुविधांची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे मुंबईत जी विकासकामे झाली त्यात आमचे शेय आहेच. आता नव्या समीकरणामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीला विसरले की काय हे मला माहीत नाही. अलिकडच्या काळात शिवसेना आणि काँग्रेसचे प्रेम रायगड जिल्हय़ात उतू चालले आहे. त्याच्या काय पाऊलखुणा आहेत किंवा कसे याची मला कल्पना नाही.

मुंबईत मेट्रो रेलचे काम कुणी केले हे जनतेला माहीत आहे. मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना एमयुटीपी, मेट्रो रेलच्या संदर्भात विधेयक विधिमंडळात मांडले होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेने या प्रकल्पांवर टीका केली होती. हे प्रकल्प दिवास्वप्न, मृगजळ ठरेल अशी खिल्ली शिवसेनेने उडवली होती. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने मेट्रो, मोनो, मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारे उड्डाणपूल, पूर्व द्रुतगती महामार्ग आदी कामे केली. आता भाजपचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी बोलत आहे. स्मारकांचे भूमिपूजन झाले. परंतु, प्रत्यक्षात कामाचा कुठेच पत्ता नाही.

सत्ताधारी शिवसेनाभाजपचे संबंध ताणले गेले आहेत. राज्य सरकारच्या स्थैर्याविषयी आपल्याला काय वाटते?

शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवेल असे मला वाटत नाही. कारण अलिकडच्या काळात सत्तेशिवाय शिवसेना एकसंधपणे वाटचाल करेल किंवा कसे याबाबत सेना नेतृत्वाच्या मनात शंका आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकमेकांची शेलक्या शब्दात संभावना करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील निवडणूक प्रचाराचा स्तर खालावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी सत्तेसाठी ते पुन्हा कधीही एकत्र येऊ शकतात असा माझा अंदाज आहे. 2015 मध्ये झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष आमने-सामने आलेच होते. आताही तशीच स्थिती असल्याने हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात.

शिवसेनेने पाठिंबा काढला तर मध्यावधी निवडणुकीची शक्यता वाटते काय?

यासंदर्भात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जी भूमिका घेतली आहे तीच आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. उद्या सरकारच्या संदर्भात शिवसेनेकडून जर काही निर्णय झाला तर त्यासंदर्भात पक्षाची काय भूमिका राहील हे पवारसाहेबांनी स्पष्टपणे मांडले आहे. राज्यात काय किंवा मुंबई महापालिकेत काय भाजप आणि शिवसेनेला आम्ही मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

रायगड जिल्हय़ात काँग्रेसशिवसेना अशी आघाडी झाली आहे. याबाबत आपले म्हणणे काय?

केंद्रीय मंत्री अनंत गीते तसेच काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी हे रायगडमध्ये एकत्र आले आहेत. या आघाडीवर हरकत घेण्याचे कारण नाही. काँग्रेस मात्र आमच्याबद्दल जी नेहमी ओरड करते ते चुकीचे आहे. काँग्रेसच्यादृष्टीने जातीयवादी असलेल्या शिवसेनेसोबत स्पष्टपणे आघाडी झाली आहे. रायगड, उस्मानाबादमधील निवडणुकीच्या प्रचारात एका बाजूला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोटो आणि दुसऱया बाजूला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून प्रचार केला जात आहे ही आघाडी त्यांना लखलाभ होवो. त्यामुळे आघाडीच्या संदर्भात काँग्रेसने नैतिकतेने बोलण्याचा अधिकार गमावला आहे. शिवसेनेनेसुद्धा काँग्रेससोबत आघाडी केल्याने त्यांना सुद्धा काँग्रेस विरोधात बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही.

मी 2002 साली नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जेव्हा शिवसेनेसोबत आघाडी झाली तेव्हा त्याचा परिणाम माझा राजीनामा घेण्यात झाला होता. केवळ शिवसेनेशी आघाडी झाली म्हणून मला दोन वेळा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेसोबत आघाडी करून काँग्रेस जो बोलघेवडेपणा करून आघाडीचे लंगडे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दुर्दैवी आहे.

स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री फार सक्रिय झाले आहेत

राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतके दिवस प्रचारात गुंतलेले मी तरी आतापर्यंत पाहिलेले नाही. मुख्यमंत्री शिवसेनेला त्यांची जागा दाखवायची या हेतूने की पक्षांतर्गत स्थान मजबूत करण्यासाठी उतरले आहेत हे मला माहिती नाही. मात्र, मुख्यमंत्री सतत निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त राहत असल्यामुळे त्याचा परिणाम हा दैनंदिन शासकीय कामकाजावर होतो.

Related posts: