|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवजयंती सोहळा उत्साहात

‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवजयंती सोहळा उत्साहात 

शिवरायांच्या विचारप्रणालीनुसारच राज्यकारभार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज खऱया अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे त्या विचारांचा अवलंब करुन राज्यकारभार करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात रविवारी दिली.

शिवजयंती निमित्त रविवारी शिवनेरी किल्ला शिवभक्तांच्या अलोट गर्दीने फुलला होता. शिवघोषाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यास पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार शरद सोनवणे, विनायक मेटे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, तसेच शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्यने उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, परकियांच्या आक्रमणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला मुक्त केले. शिवरायांच्या प्रेरणेने, स्फुर्तीने त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो समाजासमोर आदर्श निर्माण केला त्याच विचारांचा अवलंब करून राज्यकारभार लोकाभिमुख करण्यावर भर देणार आहोत. शिवाजी महाराजांनी खऱया अर्थाने रयतेला स्वाभिमान शिकविला. राज्यकारभार कसा चालवतात याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला.

समारंभापूर्वी शिवजन्मस्थळाचे ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांनी शिवजन्माचा पारंपारिक पाळणा सादर केला. यानंतर जिल्हा परिषदेच्या ठाकरवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध तरुण मंडळांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळय़ाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली. क्रीडा संघटक व ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद सावंत यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Related posts: