|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रोमहर्षक लढतीत मिनर्व्हा पंजाबची चर्चिलवर 5-4 गोलांनी मात

रोमहर्षक लढतीत मिनर्व्हा पंजाबची चर्चिलवर 5-4 गोलांनी मात 

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

रोमहर्षक लढतीत चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबचा कडव्या झुंजीनंतर 5-4 गोलांनी पराभव करून मिनर्व्हा पंजाबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत शानदार विजय साकारला. चर्चिलला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मिनर्व्हा पंजाबने 3 गुणही कमविले.

मिनर्व्हा पंजाबसाठी डॅवीड गायते, सिमरनजीत सिंग, सौविक दास, लव्हडे इनिनाया व करीम ओमोलोझा नुरेनने गोल केले तर चर्चिल ब्रदर्ससाठी अंसुमाना क्रोमाहने दोन तर चॅस्टरपॉल लिंगडोह व आदील खानने प्रत्येकी एक गोल केला.

काल हा सामना वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आला. डॅरीक परेरा या नव्या प्रशिक्षकाच्या देखरेखेखाली खेळणाऱया चर्चिल ब्रदर्सने या सामन्यात सुधारीत खेळाचे दर्शन घडविले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पंजाबच्या डॅवीड गायतेने गोल करून संघाला आघाडीवर नेले.

मात्र त्यांची ही आघाडी केवळ तीनच मिनिटे टिकली. सातव्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्सच्या चॅस्टरपॉल लिंगडोहने गोल करून बरोबरी साधली. आदील खानने चर्चिलचा दुसरा गोल केला व आघाडी मिळविली. मात्र परत चारच मिनिटांनी मिनर्व्हा पंजाबच्या सिमरनजीत सिंगने बरोबरी करणारा (2-2) गोल केला.

सामन्याच्या 31व्या मिनिटाला मिनर्व्हा पंजाबच्या सौविक दासने परत एकदा आघाडी देणारा गोल केला तरा 41व्या मिनिटाला अंसुमाना क्रोमाहने चर्चिलला 3-3 अशी बरोबरी देणारा गोल केला. मध्यंतराला उभय संघ 3-3 असे बरोबरीत खेळत होते.

दुसऱया सत्रात 51व्या मिनिटाला लव्हडे इनिनायाने मिनर्व्हाचा चौथा गोल करून परत एकदा आघाडीवर नेले तर 76व्या मिनिटाला अंसुमानाने संघाचा गोल करून चर्चिलला परत एकदा पिछाडीवरून बरोबरीत आणले. सामना 4-4 असा अनिर्णीत राहाणार असे वाटत असताना मिनर्व्हाला 87व्या मिनिटाला पॅनल्टी मिळाली.

थापाने हाणलेला फटका चर्चिलचा बचावपटू किनन आल्मेदाने हँडल केल्यामुळे मिळालेल्या पॅनल्टीवर करीम ओमोलाझा नुरेनने चर्चिल गोलरक्षकाला भेदले व विजयी गोल केला. चर्चिल ब्रदर्सचे आता 10 सामन्यांतून 6 (दहावे स्थान) व मिनर्व्हा पंजाबचे 10 गुण झाले आहेत.

Related posts: