|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कचऱयाची समस्या सोडविण्यात काणकोण पालिका अपयशी

कचऱयाची समस्या सोडविण्यात काणकोण पालिका अपयशी 

प्रतिनिधी / काणकोण

काणकोण नगरपालिका कचऱयाची समस्या सोडविण्याच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरली असून ज्या ठिकाणी आठवडय़ाचा बाजार भरतो त्याच जागी गोळा केलाला कचरा साठविण्यात येत असल्याचे दिसत आहे. काही नागरिक आपल्या घरालगतचा कचरा देखील याच ठिकाणी सरळ आणून टाकू लागले आहेत.

एका बाजूला मासळी मार्केट, दुसऱया बाजूला पालिका आणि तिसऱया बाजूला सर्वेक्षण खात्याचे कार्यालय अशी अवस्था असलेल्या या भागात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. पोटतिडकीने आवाज उठविणारा पालिकेतील विरोधी गट देखील कचऱयाच्या समस्येच्या बाबतीत सध्या पूर्णपणे गप्प बसलेला असून पालिकेचा कारभारच ठप्प झाल्याचे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. दुमाणे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाजवळ पाय टाकायला देखील जागा नाही अशी अवस्था झालेली आहे. किनारपट्टीवर व्यवहार करणारे व्यापारी रस्त्याच्या बाजूला सरळ कचरा टाकत आहेत.

कायद्याच्या कचाटय़ात महसूल बुडाला

कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या या पालिकेचा महसूल यंदा पूर्णपणे बुडालेला असून किनारपट्टीवरील व्यवहार मात्र बिनदिक्कत चालू असल्याचे दिसत आहे. या किनारपट्टीवर चालू असलेल्या पर्यटन व्यवसायांना यावर्षी पालिकेने ना हरकत दाखला दिलेला नाही. शंभरपेक्षा अधिक फायली पालिका कार्यालयात पडून असून  त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल यंदा पाण्यात गेला आहे. किनारपट्टीवरील कचरा उचलण्याचे काम मात्र नियमितपणे चालू आहे. सीआरझेडचा दाखला आणल्याशिवाय किनारपट्टीवर चालू असलेल्या व्यवसायांना ना हरकत दाखला न देण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे.

असे असताना कोणाच्या आशीर्वादाने या ठिकाणचा व्यवहार चालत आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून यासंबंधी एकही नगरसेवक आवाज काढत नसल्याचे दिसून येत आहे. सात दिवसांच्या आत सीआरझेडचा दाखला सादर केला नाही, तर सर्व अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची गर्जना केलेले मुख्याधिकारी देखील सध्या गप्पच असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत काणकोण पालिकेचा आर्थिक व्यवहार पूर्णपणे डबघाईला आलेला असून कामगारांना यापुढे मासिक वेतन देणे देखील पालिकेला जड जाणार की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.

Related posts: