दहा रूपयांची नाणी स्वीकारण्यास नकार

प्रतिनिधी /मडगाव :
500 व 1 हजार रूपयांच्या चलनी नोटा रद्द केल्यानंतर सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा गोंधळ आत्ताच कुठे संपुष्ठात येत असतानाच दहा रूपयाची चलनी नाणी स्वीकारण्यास दुकानदार, खासगी बस मालक तसेच इतर अनेक आस्थापनातून नकार दिला जात असल्याने मडगाव परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
दहा रूपयांची चलनी नाणी काही सरकारने रद्द केलेली नाही. पण, अचानक ही नाणी स्वीकारण्यास आस्थापनाच्या मालकांनी नकार दर्शविल्याने एक समस्याच निर्माण झाली आहे. दुध विक्रीची दुकाने, शिवाय किराणा मालाचे दुकानदार, खासगी बस मालक दहा रूपयांची नाणी स्वीकारत नसल्याची माहिती हाती आली आहे.
मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी देखील काही आस्थापनातून दहा रूपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याची माहिती दिली आहे. मडगावातील बरेच दुकानदार हे सुट्टे पैसे बँकेतून घेतात, त्यावेळी पाच रूपये व दहा रूपयांची नाणी बँकांतून दिली जातात, पण आत्ता दहा रूपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याने दुकानदारांसमोर सुद्धा एक समस्या निर्माण झाल्याची माहिती श्री. शिरोडकर यांनी दिली आहे.
दहा रूपयांच्या चलनी नाणी का स्वीकारली जात नाही, याचे स्पष्टीकरण देखील कुणीच देत नाही. त्याचबरोबर ही चलनी नाणी रद्द देखील केलेली नाही. त्यामुळे यावर बँकांनी देखील स्पष्टीकरण करणे आवश्यक असल्याचे मत विनोद शिरोडकर यांनी व्यक्त केले आहे.