|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यात 57 टक्के मतदान

उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यात 57 टक्के मतदान 

विशेष प्रतिनिधी/ लखनौ

उत्तर प्रदेशमधील पाचव्या टप्प्यात सोमवारी 57.36 टक्के मतदान झाले. अमेठीत मतदान केंद्राबाहेर पैसे वाटणाऱया काहीजणांवर कारवाई करण्यात आली. तर प्रतापगड मतदारसंघात विरोधी उमेदवाराला मत दिले म्हणून एका महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. अमेठीतून अखिलेश यादव मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती रिंगणात असल्याने येथील लढतीकडे साऱयांचे लक्ष आहे.

फैजाबाद, आंबेडकरनगर, सुलतानपूर, अमेठी, बलरामपूर, गोण्डा, बहराईच, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, बस्ती आणि संत कबीरनगर जिल्हय़ातील 51 जागांवर सोमवारी मतदान झाले. या मतदारसंघात 1 कोटी 84 लाख मतदार असून ते 607 उमेदवारांचे भवितव्य ठरवित आहेत.

फैजाबादमध्ये अयोध्या मतदारसंघ येत असून तेथील लढाई भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तेथे सध्या सपाचे विद्यमान आमदार तेजनारायण पांडय़े पुन्हा रिंगणात आहेत. तर भाजपतर्फे वेदप्रकाश गुप्ता रिंगणात आहेत.

या टप्प्यात सपा सरकारमधील मंत्री अवधेश प्रसाद, राममूर्ती वर्मा, गायत्री प्रसाद प्रजापती, पंडित सिंह, तेजनारायण पांडय़े, शेखलाल मांझी हेदेखील रिंगणात आहेत. प्रजापती यांच्यासमोर गरिमा सिंह आणि अमिता सिंह यांचे आव्हान असून ही लढत लक्षवेधी ठरत आहे. येथील आंबेडकरनगर आलापूर मतदारसंघातील एका उमेदवाराच्या निधनामुळे तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

2012 च्या निवडणुकीत येथील 37 जागा समाजवादी पक्षाच्या ताब्यात होत्या. बसपाकडे तीन, भाजपकडे पाच, काँग्रेसकडे पाच आणि अन्य पक्षांकडे दोन जागा होत्या. या टप्प्यात सपाबरोबरच भाजप आणि काँग्रेस, बसपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.