|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिंगणापूर योजनेस अखेरची घरघर

शिंगणापूर योजनेस अखेरची घरघर 

प्रतिनिधी/ दहिवडी

माण तालुक्यातील शिंगणापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकबाकीच्या विळख्यात अडकली असून ही योजना शेवटची घटका मोजत आहे. या योजनेचे एक कोटी 78 लाख 26 हजाराचे वीज बिल तर पाटबंधारे खात्याची 11 लाखाची पाणीपट्टी थकली आहे. ही योजना नव्याने सुरु करण्यासाठी शासनाला कोटय़ावधी रुपये खर्ची टाकावे लागणार आहेत.

थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या विरोधात सोलापूर व वडूज न्यायालयात वीज वितरण कंपनीने दावा दाखल केला आहे. ही योजना पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी शासनाला कोटय़ावधी रुपये खर्ची टाकावे लागणार आहेत. शिंगणापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 11 गावांसाठी कार्यान्वित करण्यात आली होती. शिंगणापूर, मोही, मार्डी, वावरहिरे, खुटबाव, पर्यंती, कारखेल, डंगीरवाडी, राणंद, पळशी, रांजणी, या गावांचा समावेश आहे. सोलापूर जिह्यातील धर्मपुरी येथून नीरा कालव्यातून शंभर अश्वशक्ती पंपाने पाणी आणून कारुंडे येथे मातीच्या साठवण तलावात साठवले जाते. तलावातून पुन्हा तीनशे अश्वशक्ती पंपाने पाणी उचलून शिंगणापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी आणले जाते. शिंगणापूर, कारुंडे व धर्मपुरी याठिकाणी पंप चालविण्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर आहेत.

जलशुद्धीकरण केंद्रावर अकरा गावांना व शुद्ध पाण्याचे वितरण करण्यासाठी पन्नास अस्वशक्तीचा पंप बसविण्यात आला आहे. एकंदरीत तिन्ही पंपाना साडेतीनशे अश्व शक्तीची वीज खारची पडते. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यापासून सातत्याने बंद पडण्याच्या भोवर्यात अडकत आली आहे. दुष्काळी परिस्थिती व शिंगणापूर यात्रा कालावधीत या योजनेची सर्वाना आठवण येत असते. दुष्काळ व यात्रा संपली कि या योजनेचा नेहमीच विसर पडत असतो. हि योजना बंद पडली कि शुद्धीकरण केंद्रातील साहित्य पंप व तिन्ही ठीकाणीचे ट्रान्सफार्मर नेहमी चोरीला जात असतात हा नेहमीचाच कार्यक्रम झालेला आहे. योजना सुरु होऊन बंद पडली कि ती वीज व पाणी पट्टी थकबाकीच्या विळख्यात कायम अडकत असते. गेल्या दुष्काळात तालुक्यात टँकर सुरु होते.

हे टँकर शिंगणापूर जलशुद्धीकरण केंद्रावर भरले जात होते. मात्र, ही योजना गेल्या तीन-चार वर्षापासून बंद अवस्थेत आहे. गेल्या वर्षीही शिंगणापूर यात्रा कालावधीतही योजना सुरु केली नव्हती. संपूर्ण यात्रा टँकरच्या पाण्यावर पार पडली. वीज वितरण कंपनीचे 1 कोटी 78लाख, पाटबंधारे खात्याचे11 लाख थकले गेले आहेत. दुष्काळी परिस्थितीत योजना सुरु होती योजना सुरु झाल्यापासून सर्व अकरा गावांना कधीही पाणी पोहोचले नसल्याचे पाहायला मिळत आहे. योजना सुरु नसल्याने अकरा गावांच्या साठवण टाक्या कोरडय़ा ठणठणीत आहेत. टाक्यात पाणी नसल्याने या साठवण टाक्या उन्हळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यामुळे शासनाचा कोटय़ावधी रुपयाचा निधी वाया जाणार आहे. शिंगणापूर येथून अकरा गांवाना पाईपलाईनव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप पुरल्या आहेत. मात्र या पाईप अनेक ठिकाणी चोरीला गेल्या आहेत. योजना सुरु केली त्यावेळी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जी यंत्रणा बसवली होती तीच यंत्रणा आजतागायत आहे. ही यंत्रणा कालबाह्य झाली आहे. योजना सुरु करताना बरीचशी यंत्रणा नव्याने उभी करावी लागणार असल्याने कोटय़ावधी रुपयांचा निधी खर्ची टाकावा लागणार आहे. सोलापूर जिल्हातील नीरा कालाव्यातून धर्मपुरी येथून पाणी उचलून शिंगणापूर पायथ्याला कारुंडे येथे मातीच्या साठवण तलाव करून साठवण्यात आले आहे. या साठवण तलावात पाझरून जावू नये म्हणून तलावात प्लास्टिक कागदाचा वापर केला आहे. मात्र, तो कुजून गेला असणार आहे.

Related posts: