|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी कामगार सेना वेतन करारासाठी संघर्ष करेल!

एसटी कामगार सेना वेतन करारासाठी संघर्ष करेल! 

कणकवलीराज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱयांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी कामगार वेतन करार वाढीसाठी एसटी कामगार सेना संघर्ष करेल आणि वेतन करार वाढवून घेईल, अशी ग्वाही राज्य एसटी कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस हिरोजी रेडकर आणि कोषाध्यक्ष रहाटे यांनी येथे दिली.

राज्य एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरोजी रेडकर आणि कोषाध्यक्ष  रहाटे, जिल्हा संपर्कप्रमुख उत्सेकर, शैलेश सुर्वे हे सिंधुदुर्ग दौऱयावर आले असता, त्यांनी येथील एसटी विभागीय कार्यशाळा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी जिल्हा सचिव गीतेश कडू उपस्थित होते.

रेडकर, रहाटे म्हणाले, सध्या एसटी कर्मचाऱयांची प्रमुख मागणी म्हणजे होऊ घातलेला वेतन करार आहे. याची आम्हाला जाणीव आहे. आज राज्यात परिवहनमंत्री सेनेचे दिवाकर रावते आहेत. त्यांच्याशी संपर्क कायम ठेवून लवकरच वेतन करार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. एसटी सेनेच्या प्रयत्नातून सध्या महागाईभत्ता, बोनस वेळेवर दिला जात आहे. जो यापूर्वी वेळेत दिला जात नव्हता. यापुढे कर्मचाऱयांना चांगला युनिफॉर्म देण्यात येणार आहे.

गीतेश कडू यांनी कामगारांच्या प्रलंबित समस्या मांडून त्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, अशी मागणी केली. दरम्यान, कामगार सेनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हय़ात लवकरात लवकर मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

चर्चेत विभागीय एसटी कार्यशाळा कार्यकारिणी पदाधिकारी सुशिल कदम, गणपत धाकोरकर, बी. बी. जाधव, एस. बी. खाडे, पी. व्ही. लाड, एस. एच. गोसावी, ए. टी. कदम, कणकवली आगारातील तेली, तारी, कुडतरकर, तांबे, देवगड आगाराचे जामसंडेकर, चव्हाण, कुलये, पाटकर, विजयदुर्ग आगारातील सी. ए. चव्हाण, बाबा इस्वलकर, पाटील, वेंगुर्ले आगाराचे भगत, सतीश घोगळे आदींनी भाग घेतला.