|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » बंगालकडून मुंबई पराभूत

बंगालकडून मुंबई पराभूत 

विजय हजारे चषक स्पर्धा : मुंबई 96 धावांनी पराभूत, अभिमन्यु इसावरनचे शतक,

वृत्तसंस्था/ चेन्नई

येथे सुरु असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत मनोज तिवारीच्या नेतृत्वाखालील बंगालने मुंबईच्या विजयी घोडदौडीला लगाम लावला. प्रथम फलंदाजी करताना बंगालने 230 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ केवळ 134 धावा करु शकला. या दणदणीत विजयासह बंगालने क गटात 16 गुणासह अग्रस्थानी झेप घेतली आहे. मुंबईचा संघ मात्र सलग दोन पराभवामुळे चौथ्या स्थानी फेकला गेला आहे.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱया बंगालची सुरुवात डळमळीत झाली. सलामीवीर गोस्वामीला (8) शार्दुल ठाकुरने तिसऱयाच षटकांत बाद करत बंगालला पहिला धक्का दिला. चेपॉक स्टेडियमवर बंगालचा अभिमन्यु ईसावरन वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या रचता आली नाही. अभिमन्युने शानदार शतकी खेळी साकारताना 152 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 127 धावा केल्या. त्याच्या या शतकी खेळीमुळेच बंगालला 230 धावापर्यंत मजल मारता आली. अनुस्तुप मुजुमदार (25) व अमीर गानी (25) धावांचे योगदान दिले. मुंबईतर्फे शार्दुल ठाकुरने 47 धावांत 4 गडी बाद केले. अभिषेक नायरने 3 गडी बाद केले.

प्रत्युतरादाखल खेळताना मुंबईचा डाव 36.2 षटकांत 134 धावांवर आटोपला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. मुंबईचा श्रेयस अय्यर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अय्यरने 34 धावा केल्या. कर्णधार तरे (20), सिध्देश लाड (23) धावांचे योगदान दिले. पण, ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने मुंबईला 96 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बंगालतर्फे प्रज्ञान ओझा व सयान घोषने प्रत्येकी 3 गडी बाद केले. या विजयासह बंगालला 4 गुण मिळाले आहेत.

संक्षिप्त धावफलक : बंगाल 48.5 षटकांत सर्वबाद 230 (अभिमन्यु इसावरन 127, अनुस्तुप मुजुमदार 25, शार्दुल ठाकुर 4/47, अभिषेक नायर 3/35), मुंबई 36.2 षटकांत सर्वबाद 134 (श्रेयस अय्यर 34, सिध्देश लाड 23, आदित्य तरे 20, प्रज्ञान ओझा 3/28, सयान घोष 3/48).

महाराष्ट्राला पराभवाचा धक्का, उत्तर प्रदेश विजयी

कटक : विजय हजारे चषक स्पर्धेतील अन्य एका लढतीत उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला 104 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावत 370 धावा केल्या. सलामीवीर प्रशांत गुप्ता (129) व शिवम चौधरी (116) यांनी शानदार शतके झळकावली. प्रत्युतरादाखल खेळणाऱया महाराष्ट्राचा डाव 38.5 षटकांत 266 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार केदार जाधव (68), राहुल त्रिपाठी (57) यांची अर्धशतके व्यर्थ ठरली. पियुष चावलाने 50 धावांत 5 बळी घेत युपीच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली.