|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयाचे तहसिलदार बनताहेत निराधारांचे आधार

साताऱयाचे तहसिलदार बनताहेत निराधारांचे आधार 

सुशांत पाटील/ सातारा / यमाजी पाटलाची वाडी

कीर्तनात संत गाडगेबाबा नेहमी श्रोत्यांना विचारत, तुम्ही देव पाहिलाय का? यावर श्रोते नाही म्हणायचे. मग गाडगेबाबा आपल्या शेजारी उभे असलेल्या पांढऱया दाढीच्या मळकट कपडे घातलेल्या व्यक्तींकडे बोट दाखवून हा पहा तुमच्या-माझ्यातला देव. पुढे सांगायचे हे भाऊराव पाटील गोर-गरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते कष्ट घेतात. त्यांच्या या बोलक्या उदाहरणावरून त्याकाळातही शिक्षणाला अनन्य साधारण महत्व असल्याचे दिसून येते. अलिकडे धावत्या युगात प्रत्येकजण स्वत:चाच विचार करत असतो. आपण आाणि आपलं कुटुंब या पलिकडे जाऊन कोण कुणाचा विचार करत नाही. त्यामुळे लोकांना बाहेरचं जग दिसत नाही. आज लोकांचे अनेक प्रश्न अन् समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी केवळ चर्चा न करता स्वत: पुढाकार घेऊन सामाजिक बांधिकली जोपासण्याचं काम सातारचे तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी केले आहे. त्यांचे मूळ गाव यमाजी पाटलाची वाडी येथील आर्थिकदृष्टय़ा वंचित असलेल्या पाच मुलांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. इतकेच नव्हे तर तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी हा संकल्प प्रत्येक वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे.

समाजात आज शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शिक्षणामुळेच व्यक्तीला समाजात किंमत मिळते. एक व्यक्ती जर शिकली तर त्याच्या तीन पिढय़ांना त्याच्या शिक्षणाचा फायदा होतो. हे तहसिलदार चव्हाण यांनी दाखवून दिले आहे.  गावातील मुलांमध्ये लहान वयातच शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी पुढाकार घेऊन त्यांचे वडील  स्व. एन. के. चव्हाण (आण्णा) यांच्या स्मरणार्थ यमाजी पाटलाची वाडी या गावातील पाच गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही चव्हाण यांनी उचलला आहे.

तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण हे सातारला रूजू होऊन एक वर्षे पुर्ण होत आले. ते या अगोदर बारामती येथे तहसिलदार म्हणून काम पाहत होते. तेथेही त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘आदर्श तहसिलदार’ म्हणून गौरवले होते. तहसिलदार चव्हाण हे मूळचे सांगली जिल्हय़ातील आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातील यमाजी पाटलाची वाडी या गावातील आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला.

प्रत्येक वर्षी घेणार पाच गरीब विद्यार्थी दत्तक

यमाजी पाटलाची वाडी या गावातील बहुतांश लोकांचा सोन्या-चांदीचा (गलाई) व्यवसाय आहे. या व्यवसायानिमीत्त ही व्यापारी मंडळी भारतातील विविध भागात विखुरलेली आहेत. त्यामुळे गावातील जी गरीब मुलं आहेत, ती मुलं शिक्षण परवडत नसल्यामुळे चौथी-पाचवीतूनच शिक्षण सोडून सोन्या-चांदीच्या व्यवसायाकडे वळतात. पुढे याच मुलांना शिक्षण नसल्यामुळे सोन्या-चांदीच्या व्यवसायात बऱयाच वेळेला दगाफटक्यालाही सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. हे ओळखून तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी यमाजी पाटलाची वाडी या शाळेचे मुख्याध्यापक शरद चव्हाण, सहशिक्षिका साधना चव्हाण व गावातील प्रतिष्ठीत  लोकांच्या उपस्थितीत प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद यमाजी पाटलाची वाडी शाळेतील  पाच विद्यार्थी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related posts: