|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे बेमुदत उपोषण सुरू

एसटी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे बेमुदत उपोषण सुरू 

कणकवली : 2015 च्या एसटी भरतीमधील उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवून नंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत मागणी करूनही गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीच न झाल्याने या भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांनी विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस तालुकाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन प्रतिनिधींसह 7 रोजी आमदार नितेश राणेंची मुंबईत भेट घेऊन उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या 2015 च्या चालक भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीवर असलेल्या 20 उमेदवारांनी आपल्याला सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती. यासंदर्भात चौकशी करून न्याय देण्याची मागणी 8 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन विभाग नियंत्रकांकडे केली होती. आतापर्यंत त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

प्रतीक्षा यादीतील संदीप सावंत, सचिन तावडे, मच्छींद्र पाटणकर, अभिजीत परब, संदेश राणे, मुदस्सर काझी, आत्माराम जाधव, कुंदन दाभोलकर, कमरुद्दीन शेख, विलास परब, विक्रांत परब, विशाल भिसे आदी उमेदवार उपोषणाला बसले होते. 2015 च्या भरतीत एकूण 149 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यापैकी 129 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. तर 20 उमेदवारांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले होते. ज्या 129 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती, त्यात 115 उमेदवार हे सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील होते. यापैकी सर्वसाधारण प्रवर्गातील 5 उमेदवार हजर झालेच नाहीत. या उमेदवारांना विभाग नियंत्रक स्तरावरून पत्र पाठवून ते हजर न झाल्याने त्यांची नियुक्ती रद्द केल्याचे कळविण्यात आले. ही कार्यवाहीही वर्षाच्या आत झाली होती, असे माहिती अधिकारात समोर आले आहे. मग त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवर उमेदवारांचा समावेश का झाला नाही? या कालावधीत सर्वसाधारण प्रवर्गातील चालकांची पदे रिक्त असताना आमच्यावर अन्याय का? असा सवालही या उमेदवारांनी केला.

दरम्यान, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नवनिर्वाचित पं. स. सदस्य सुभाष सावंत, मिलिंद मेस्त्राr, शरद कर्ले आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. सिंधुदुर्गमधील या उमेदवारांना एसटीकडून अन्याय झाल्याने याप्रकरणी सुरेश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानुसार तातडीने दोन उपोषणकर्त्यांसह सावंत हे सायंकाळी मुंबईला रवाना झाला. प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांवर झालेल्या या अन्यायाला अधिवेशनात तसेच मंत्री पातळीवर वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावंत म्हणाले. 

नियुक्ती देण्यात आलेले उमेदवार हजर न झाल्यास त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येते, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीत नियुक्ती देण्यात आलेल्यांपैकी पाच सर्वसाधारण प्रवर्गाचे उमेदवार हजर झाले नाहीत. मग त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा समावेश कसा  झाला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांची प्रकृती बरी नसल्याने ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Related posts: