|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » टीम इंडियाचे प्रायोजकत्व ‘ओप्पो’ मोबाईल कंपनीकडे

टीम इंडियाचे प्रायोजकत्व ‘ओप्पो’ मोबाईल कंपनीकडे 

स्टार इंडियाची जागा घेणार, तब्बल 1079 कोटी रुपये मोजत घेतले अधिकार,

एप्रिलमध्ये संघ दिसणार नव्या जर्सीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टीम इंडियाला नवा प्रायोजक मिळाला असून चीनमधील मोबाईल कंपनी असणाऱया ओप्पो कंपनीने बीसीसीआयसोबत पाच वर्षासाठी करार केला आहे. या कराराला 1 एप्रिल 2017 रोजी सुरुवात होणार आहे. यामुळे एप्रिल महिन्यात भारतीय संघ नव्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. ओप्पो कंपनीने या करारासाठी तब्बल 1079 कोटी रुपये मोजले आहेत. याआधी टीम इंडियाचे प्रायोजकत्व स्टार इंडियाकडे होते.

7SPO-03-Oppo Logo

सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने दुसऱयांदा बोली न लावण्याचा निर्णय घेतला होता. स्टार इंडियासोबत बीसीसीआयने 1 जानेवारी 2014 रोजी करार केला होता. 31 मार्च रोजी हा करार संपुष्टात येणार आहे. यानंतर, भारतीय संघाचे मुख्य प्रायोजकत्व ओप्पोकडे जाईल. डिसेंबर 2013 मध्ये सहाराचे प्रायोजकत्व संपुष्टात आल्यानंतर स्टार इंडियाकडे भारतीय संघाचे प्रायोजकत्व आले होते. नव्या करारानुसार ओप्पो कंपनीकडे भारतीय कनिष्ठ व वरिष्ठ तसेच महिला संघाचे प्रायोजकत्व असणार आहे. या करारानुसार ओप्पो भारतात होणाऱया मालिकेसाठी 4.61 कोटी रुपये तर आयसीसी सामन्यासाठी 1.56 कोटी रुपये देणार आहे. विशेष म्हणजे, स्टार इंडिया भारतातील सामन्यासाठी 1.92 कोटी तर आयसीसी सामन्यासाठी 61 लाख रुपये देत होते. ओप्पो या कंपनीने लावलेली बोली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली असल्याचे बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांनी सांगितले.

या प्रायोजकत्वासाठी पायाभूत किंमत यावेळी 538 कोटी रुपये इतकी ठेवली होती. एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्षात भारतीय संघ 259 सामने खेळणार आहे. यातील 238 सामने दोन संघांत तर 21 आयसीसीच्या स्पर्धांमध्ये होणार आहेत. टीम इंडियाचे प्रायोजकत्व मिळवण्यासाठी देशविदेशातील अनेक कंपन्यांनी तयारी दाखवली होती. यामध्ये पेटीएम, रिलायन्स जिओ, आयडिया यासोबत नऊ कंपन्यानी बोली लावली होती. अखेरीस ओप्पो इंडियाने 1079 कोटी रुपयांची बोली लावत पुढील पाच वर्षासाठी संघाच्या प्रायोजकत्वाचे अधिकार विकत घेतले आहेत.