|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दीपिका जाधवच्या खुन्याचा शोध घ्या!

दीपिका जाधवच्या खुन्याचा शोध घ्या! 

सिंधुदुर्गनगरीमालवण तालुक्यातील राठिवडे येथील मागासवर्गीय महिला दीपिका अमित जाधव हिचा घातपात झाला आहे. याबाबतची तक्रार देऊनही पोलीस यंत्रणेकडून काहीच तपास झालेला नाही. पोंथुर्ले ऍट्रॉसिटी प्रकरणातही पोलिसांकडून संबंधितांना अटक झाली नाही. त्यामुळे दोन्ही प्रकरणांत तात्काळ तपास करून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा अत्याचार निवारण कृती समितीने जिल्हाधिकाऱयांना दिला आहे. प्रसंगी मोर्चा काढू, असेही त्यांनी म्हटले आहे.

अत्याचार निवारण कृती समितीचे अध्यक्ष नाना डामरेकर, विश्वनाथ कदम, सुदीप कांबळे, विश्वनाथ पडेलकर, सुजित जाधव, दीपक जाधव, कृष्णा कांबळे, दिलीप तिर्लोटकर आदींनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राठिवडे येथील दीपिका जाधव बेपत्ता झाल्यापासून तिचे पती अमित यांनी 2 जानेवारी 2017 रोजी बेळणे पोलीस दूरक्षेत्रात खबर दिली. तसेच 3 जानेवारी  रोजी आचरा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देऊन संशयितांची नावेही दिली. परंतु आजपर्यंत गुन्हे नोंदवून संशयितांना अटक झाली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच देवगड तालुक्यातील पोंथुर्ले गावातील प्रकरणात विलास सीताराम कांबळे यांच्या विकत घेतलेल्या वहिवाटीच्या जमिनीत बेकायदा शिरकाव करून बोगस कागद तयार करून बळकावली. खोटय़ा गुह्यांमध्ये फसवून जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार 10 जानेवारी रोजी देऊन सुद्धा संशयितांना आजपर्यंत अटक केलेली नाही.

या दोन्ही घटना अत्याचारीत व अतिशय गंभीर आहेत. परंतु पोलीस यंत्रणा आरोपींना पाठिशी घालण्याचे काम करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी या दोन्ही अत्याचारीत घटनेमध्ये गांभीर्याने लक्ष घालून संशयितांना गजाआड करावे. आठ दिवसात याची तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडून जिल्हाव्यापी मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे.