|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पं. स. सभापती निवड आज

पं. स. सभापती निवड आज 

सिंधुदुर्गनगरी : जिल्हय़ातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक 14 मार्चला होत आहे. इच्छूक उमेदवारांनी सभापतीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र सभापतीपदाची लॉटरी कुणाला लागणार, हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. कुडाळ तालुका सभापतीपद अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेनेचे राजन जाधव हे एकमेव सदस्य असल्याने सभापतीपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले आहे.

जि. प. व पं. स. ची पंचवार्षिक निवडणूक 21 फेब्रुवारीला झाली. 23 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. पंचायत समित्यांची मुदत 14 मार्चला संपत असल्याने पं. स. सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक 14 मार्चला, तर जि. प. ची मुदत 21 मार्चला संपत असल्याने जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 21 मार्चला होणार आहे. पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीनुसार त्या-त्या प्रवर्गातील सदस्यांना सभापतीपदाची संधी प्राप्त झाली आहे.

कुडाळ पंचायतीवर शिवसेनेने बहुमत मिळवले आहे. सभापतीपद अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेनेचेच एकमेव उमेदवार राजन जाधव हे आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. मंगळवारी निवडीची औपचारिकता राहिली आहे.

मालवण पंचायत समितीवर काँगेसला बहुमत मिळवता आले असून सभापतीपद इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. या प्रवर्गामधून काँगेसमधून निवडून आलेल्या सोनाली केदे (कोळंब) व मनिषा वराडकर (कुंभारमाठ) या दोनच सदस्या आहेत. त्यापैकी वराडकर यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची अधिक शक्यता आहे. सावंतवाडी पंचायत समितीवरही काँगेसने बहुमत मिळवले असून सभापतीपद इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातून काँग्रेसमधून निवडून आलेले रवींद्र मडगावकर (कलंबिस्त) व पंकज पेडणेकर (तळवडे) या दोघांना संधी आहे. त्यापैकी मडगावकर यांची सभापतीपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

देवगड पंचायत समितीवर शिवसेना-भाजपची युतीची सत्ता आहे. या ठिकाणी सभापतीपद महिला सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे. भाजपचे संख्याबळ जास्त असून महिला सर्वसाधारणमधून निवडून आलेल्या भाजपच्या पूर्वा तावडे (पडेल) व प्राजक्ता घाडी (किंजवडे) या दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे. वेंगुर्ले पंचायत समितीवर शिवसेनेने बहुमत मिळवले आहे. सभापतीपद खुले असून खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले यशवंत परब (तुळस), सुनील मोरजकर (आसोली) या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दोडामार्ग पंचायत समितीवर शिवसेना, भाजपला बहुमत मिळाले आहे. सभापतीपद खुले असून या ठिकाणी शिवसेना व भाजपचे संख्याबळ प्रत्येकी दोन आहे. त्यामुळे सभापती पदासाठी चुरस होणार असून शिवसेनेचा की भाजपचा होणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेकडून धनश्री गवस, तर भाजपकडून लक्ष्मण नाईक हे सभापती पदाचे उमेदवार दावेदार मानले जात आहेत.

वैभववाडी पंचायत समिती सभापती पद खुले आहे. मात्र या ठिकाणी त्रिशंकू अवस्था असल्याने चिठ्ठी टाकून सभापती निवडला जाण्याची शक्यता आहे.  कणकवली सभापतीपद महिला सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे. या ठिकाणी काँग्रेसला पूर्ण बहुमत असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. भाग्यलक्ष्मी साटम यांचे नाव आघाडीवर आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 नामनिर्देशन पत्र दाखल करणे, दुपारी 3 वाजता निवडीसाठी विशेष सभेला सुरुवात करून दुपारी 3 ते 3.10  वाजता नामनिर्देशनपत्रांची छानणी करणे, 3.11 ते 3.15 वाजता वैध उमेदवारांची नावे घोषित करणे, 3.16 ते 3.30 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेणे, 3.31 ते 3.34 वाजता निवडणूक लढविणाऱया उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणे, आवश्यकता भासल्यास 3.35 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.

Related posts: