|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आगरा रेल्वे स्थानकानजीक 2 स्फोट

आगरा रेल्वे स्थानकानजीक 2 स्फोट 

जीवितहानी नाही : अंदमान एक्स्प्रेस होती लक्ष्य

वृत्तसंस्था / आगरा

उत्तरप्रदेशातील आगरा शहरात शनिवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन स्फोट झाले. एक स्फोट आगरा कँट रेल्वेस्थानकानजीक कचऱयाच्या ढिगात झाला, तर दुसरा स्फोट एका प्लंबरच्या घरात झाल्याचे समजते. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. याआधी शुक्रवारी अंदमान एक्स्प्रेस पलटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याचबरोबर पाक हेरयंत्रणा आयएसआयच्या नावाने एक पत्र देखील हस्तगत झाले आहे.

पहिला स्फोट सकाळी 6.30 वाजता प्लॅटफॉर्मनजीक कचऱयाच्या ढिगात झाला, दुसरा स्फोट प्लंबरच्या घरानजीक झाला, दोन्ही ठिकाणांमधील अंतर 60-70 मीटर आहे. प्लंबरच्या घरात बॉम्बनिर्मित्ती झाल्याची माहिती समोर येत असून पूर्ण भाग सील करण्यात आला आहे. स्फोट झालेला बॉम्ब कमी क्षमतेचा होता असे समजते.

रेल्वेगाडी लक्ष्य

आगरा येथील भांडई स्थानकानजीक शुक्रवारी रात्री अज्ञात संशयितांनी रेल्वेमार्गावर मोठा दगड ठेवून चेन्नईहून जम्मूला जात असलेली अंदमान एक्स्प्रेस पलटविण्याचा प्रयत्न केला, रेल्वे दगड फोडत निघून गेल्याने दुर्घटना टळली. रेल्वेची दगडाला धडक बसल्याने मोठा आवाज झाला, ज्यामुळे रेल्वेचालकाने त्वरित याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच लाइनमन घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला दगडाचे तुकडे आणि जवळच एक पत्र सापडले. पत्र लिहिणाऱयाने स्वतःला आयएसआयचा कमांडर आणि राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद मिर्झा म्हटले.

पत्रातील उल्लेख

पत्र लिहिणाऱयाने पोलिसांसमवेत नेते आणि उद्योजकांना 14 एप्रिलबद्दल इशारा दिला आहे. त्याचबरोबर आगरा शहरात आपण झेंडे आणि स्फोटकांसह आल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. पत्रात 8 ठिकाणी हल्ले करण्यात येतील असा उल्लेख आहे. यात संसद भवन, लखनौ, आगरा, मथुरा या ठिकाणांबरोबरच उत्तरमध्य रेल्वे,  नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग यांच्यावर हल्ला केला जाईल अशी धमकी देण्यात आली.

Related posts: