|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्नी प्रसंगी नाक दाबून तोंड उघडविण्यास तयार

सीमाप्रश्नी प्रसंगी नाक दाबून तोंड उघडविण्यास तयार 

आमदार नितेश राणे यांचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

सीमाप्रश्न महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडण्याची ग्वाही आपण येथे देत आहोत. कर्नाटकाने जे काही अत्याचार सुरु ठेवलेत ते योग्य वेळी थांबले नाहीत तर आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडावा लागेल. नारायण राणेंनी मुख्यमंत्रिपदावर असताना प्रसंगी नाक दाबण्याचा इशारा दिला होता. आजही त्यांची आणि माझी भूमिका ठाम आहे. सीमाप्रश्नी शिवसेना आणि भाजपचे सरकार चालढकल करीत असल्यास प्रसंगी नाक दाबून तोंड उघडविण्याची आपली तयारी आहे, असा इशारा कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी दिला.

शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव आणि त्यानिमित्ताने आयोजित महाराष्ट्र महोत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, आमदार संभाजी पाटील, स्वागताध्यक्ष मालोजी अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नेहमीच बेळगावला येवून आनंद वाटतो. हा बेळगाव उद्या महाराष्ट्रात नक्कीच असेल, असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करत आहेत. सीमाप्रश्नातली आताची परिस्थिती, महाराष्ट्र सरकारची भूमिका, कर्नाटकाकडून होत असलेला अत्याचार अशा साऱया परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. तरीही आपल्या हक्काचा माणूस म्हणून हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेत आक्रमकपणे मांडेन, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिली.

बेळगावात मराठा मोर्चात लाखो लोक सहभागी झाले. त्याबाबतीत जी काही अडवणूक झाली ती निषेधार्ह आहे. येथील पोलीस जय महाराष्ट्र लिहिलेल्या टीशर्ट विपेत्यालाही अटक करतात. हे अत्याचार थांबवायला हवेत. आम्ही महाराष्ट्रात आमचा तिसरा डोळा उघडला तर तुमच्या लोकांना राहणेही अवघड जाईल. आम्ही जर गंभीर भूमिका घेतली तर पुन्हा विचार करण्यास वेळही मिळणार नाही. बुधवारपासून महाराष्ट्राचे विधानसभा अधिवेशन सुरु होत आहे. त्यावेळी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारुन बेळगावचा आवाज तिथवर नक्कीच पोहोचवेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 मराठी भाषिक मूकमोर्चा काढतात. हा इतिहासात आश्चर्य व्यक्त करण्यासारखा प्रकार आहे. शिवाजी महाराज असते तर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले असते. मराठा जनांनी हातात तलवार घेऊन आक्रमकपणे मोर्चे काढायला हवेत. या मूक मोर्चांचा नेमका काय परिणाम होणार आहे हे आश्चर्यकारकच आहे. जबडा फाडून दात मोजण्याची जात आमची. मात्र आम्ही हा ठेकाही फडणवीसांनाच देवून ठेवला आहे, असे ते उपरोधाने म्हणाले.

सीमाप्रश्न आक्रमकपणे मांडावा

प्रारंभी किरण ठाकुर यांनी सीमावासीयांच्यावतीने आपली बाजू मांडली. आज एक तरुण तडफदार आमदार म्हणून नितेश राणे ओळखले जातात. त्यांनी सीमाप्रश्नावर एक चांगला सिनेमाही काढला आहे. आमचा सीमाप्रश्न त्यांनी आक्रमकपणे मांडावा. महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांना एकत्रित घेऊन दिल्लीकरांना झुकवावे हीच सीमावासीयांची इच्छा आहे. येथे आम्हाला आमची मराठी भाषा दिली जात नाही. पाणी मागण्यासाठी मात्र येथील राजकर्ते महाराष्ट्राचे पाय धरतात, आम्ही मोठा भाऊ म्हणून पाणी देण्याची जबाबदारी निभावतो. मात्र त्यांना त्याची जाण नाही. ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.

नारायण राणे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी नाक दाबले तर तोंड उघडेल, असा इशारा दिला होता. आज तो पूर्ण करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या पदरी नेहमीच पराभव का? असा प्रश्न उपस्थित करतानाच हा साधा प्रश्न सोडून घेण्यासाठी महाराष्ट्राने एकमुखी उभे रहायला हवे, असे ते म्हणाले. महानगरपालिकेत पुन्हा एकदा भगवा फडकल्याबद्दल सर्व नगरसेवक आणि विशेषतः आमदार संभाजी पाटील यांचे त्यांनी अभिनंदन केले. आम्हाला खरे तर निवडणूक महाराष्ट्रात लढवायची आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. यावेळी आपली ताकद दाखविण्यासाठी पाच आमदार निवडून आणावे लागतील, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी मालोजी अष्टेकरांच्या हस्ते किरण ठाकुर यांचा, संभाजी पाटील यांच्या हस्ते नितेश राणेंचा सन्मान करण्यात आला. एमपीएससी परीक्षेत तोंडी परीक्षेसाठी नाकारल्या गेलेल्या आणि नितेश राणेंच्या मदतीने तोंडी परीक्षा देवू शकलेल्या ज्योती पाटील व त्यांचे वडील पत्रकार डी. के. पाटील यांच्या हस्ते नितेश राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. बेळगाव महोत्सवात आपली कला सादर करणाऱया भार्गव पथक तसेच कोल्हापूरच्या खंडोबा तालीम मंडळाच्या कलाकारांचा विशेष सन्मान झाला.

महापौर व नगरसेवकांचा सत्कार

तत्पूर्वी महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बेळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकलेल्या महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर तसेच सर्व 33 नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. मशाल प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. शाहीर अमर शेख यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. मदन बामणे यांनी प्रास्ताविक तर स्वागताध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी स्वागतपर भाषण केले.

सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळावा

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमर शेख यांच्या शाहीरीमुळे मरगळलेल्या मनाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र शाहीरांच्या पोवाडय़ाने उभारले. पारतंत्र्यातून स्वातंत्र्यांचे स्पुलिंग चेतविण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यानंतरचा सीमाप्रश्न तसेच दिल्लीतील मोर्चात शाहीरीचा प्रभाव मोठा आहे, असे ते म्हणाले. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. खरे तर ही वादळापूर्वीची शांतता आहे. न्यायालयीन लढय़ासंदर्भात सीमावासीयांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न नक्कीच करु, असे ते म्हणाले.

प्रमुख वक्ते आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात शाहीर अमर शेख म्हणजेच बारशी गावातल्या मेहबुब शेख या तरुणाचा सारा जीवनपटच उलगडला. ब्रिटीश कालीन आंदोलने, कामगार संघटनांची चळवळ, शेतकरी चळवळी, नाविकांचे बंड आणि त्यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत त्यांनी दिलेले योगदान मेणसे यांनी मांडले.

कॉ. कृष्णा मेणसे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सुरज कणबरकर यांनी आभार मानले. यानंतर महाराष्ट्र महोत्सवात महाराष्ट्रातील लोककला आणि लोकसंगीतावर आधारीत विशेष कार्यक्रम झाला. माजी मैना गावाकडे राहिली हा पोवाडा, गर्जा महाराष्ट्र माझा आदी गीतांच्या जोरावर लोककला कलाकारांनी बेळगावकर रसिकांना महाराष्ट्रात असल्याचा अनुभव घडवून दिला.