|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 73 लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर 73 लाखांचे सोने जप्त 

दागिन्यांच्या स्वरूपात होते 2.8 किलो सोने प्रवाशाला अटक, कस्टम विभागाची कारवाई

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर 2 किलो 8 ग्रॅम वजनाचे व सुमारे 73 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने पकडण्यात आले आहे. या प्रकरणी एका हवाई प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या गोव्यातील अधिकाऱयांच्या पथकाने गुरूवारी सकाळी ही कारवाई केली. कस्टम विभागाने या तस्करी प्रकरणी ताब्यात घेऊन अटक केलेल्या हवाई प्रवाशाचे नाव उघड केलेले नाही.

  मागच्या महिन्यात एका मागोमाग झालेल्या सोन्याची तस्करी पकडण्याच्या दोन घटनांनतर गुरूवारी सकाळी कस्टम अधिकाऱयांच्या हाती पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचे घबाड लागले. दाबोळी विमानतळावर तैनात राहणाऱया कस्टम विभागाच्या हवाईतज्ञ पथकाला सोन्याच्या तकस्करीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱयांच्या या पथकाने विमानतळावर पाळत ठेवली होती. त्यातूनच एक हवाई प्रवाशी या अधिकाऱयांच्या हाती लागला.

 अटक केलेला प्रवासी रत्नागिरीचा

 कस्टमच्या सुत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्या हवाई प्रवाशाकडून 2 किलो 8 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे, तो प्रवासी महाराष्ट्रातील रत्नागिरीचा 33 वर्षांचा युवक आहे. दोहा कतारहून दुबईमार्गे तो कतार एअरवेजच्या विमानातून गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरला होता. परदेशगमन विभागाकडून झालेल्या तपासणीवेळी त्याच्याकडे सोने सापडले. हे सोने त्याने अवैध मार्गाने भारतात आणले होते. हे सर्व सोने दागदागिन्यांच्या स्वरूपात होते. त्याने हे सोने आपल्या अंगावरच लपवले होते. कस्टमच्या अधिकाऱयांनी हे सोने जप्त करून त्याला अटक केली. बहुतेक वेळा विदेशातून भारतात अवैध मार्गाने आणण्यात येणारे सोने हे कांडय़ा किंवा बिस्कीटांच्या स्वरूप असते. मात्र, या कारवाईत तस्करीचे सोने दागदागिन्यांच्या स्वरूप असल्याचे आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किमत सुमारे 73 लाख रूपये एवढी आहे. या प्रकरणी गोवा कस्टम विभाग अधिक तपास करीत आहे.

 कस्टमच्या गोवा विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरवकुमार जैन यांच्या देखरेखीखाली आणि कस्टमच्या गोवा विभागाचे अतिरीक्त आयुक्त एस.के.सिन्हा व कस्टमच्या गोवा विभागाचे आयुक्त के, अनपाझाकन यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली.

 

Related posts: