|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » ‘आधार’च्या अतिवापराने पॅन कार्ड होणार कालबाहय़

‘आधार’च्या अतिवापराने पॅन कार्ड होणार कालबाहय़ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या दोन वर्षात आधार कार्डचा वापर अनेक सरकारी योजनांसाठी करण्यात येत आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या आधारऐवजी पॅन कार्डचा वापर करण्यात येत आहे. आधार कार्डवर नागरिकांची बायोमॅट्रिक आणि अन्य माहिती अधिक विस्तृत स्वरुपात असल्याने प्राप्तिकर विभागाने पॅनऐवजी आधार कार्डचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे.

प्रायोगिक पातळीवर आधार कार्डचा वापर करण्यास 2012 मध्ये सुरूवात करण्यात आली होती. याचप्रमाणे पॅन कार्डचीही माहिती देण्यास सांगण्यात आले होते. आधार कार्डमध्ये हाताचे ठसे आणि आयरिस स्कॅन करण्यात आल्याने पॅन कार्डपेक्षा आधार कार्ड अधिक विश्वासार्ह असते. अनेक करदाते पॅन कार्डचा गैरवापर करत बनावट कार्ड तयार करत असल्याचे प्राप्तिकर विभाग आणि सरकारच्या निदर्शनात आले. भविष्यात सरकारी योजनांसाठी पॅन कार्डच्याऐवजी ‘आधार’चा वापर करण्यात येईल, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱयाने म्हटले.

सध्या पॅन कार्ड बरखास्त करण्याचा सरकारचा विचार नाही. सध्या 250 दशलक्ष पॅनकार्ड वितरित करण्यात आली आहेत, त्यापैकी 40 दशलक्ष कार्डचा वापर वैयक्तिक प्राप्तिकर भरण्यासाठी केला जात आहे. आधार कार्डने अधिक व्यवहारात पारदर्शकता येत असल्याने भविष्यात अनेक योजनांसाठी ते वापरण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.