|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ’फॅड’ चित्रपटाव्दारे चिमुकल्यांच्या भावविश्वावर प्रकाश

’फॅड’ चित्रपटाव्दारे चिमुकल्यांच्या भावविश्वावर प्रकाश 

प्रतिनिधी/ आटपाडी

लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत आज प्रत्येकजण मोबाईल, व्हॉटस्अप, फेसबुक, इंटरनेटच्या जाळय़ात अडकला आहे. त्यामुळे मानवी जीवनाचे यांत्रिकीकरण झाले आहे. शिवाय बालपणही या यांत्रिकीकरणात हरविले आहे. चिमुकल्यांच्या याच भावविश्वाला पुन्हा चालना देण्याच्या हेतुने आधुनिकतेतून पारंपारिक खेळाकडे त्यांना आकर्षित करत त्यांच्या मानसिकता जाणुन घेण्याचा प्रयत्न करत ’फॅड’ या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली आहे.

पुण्यातील आयन मिडीया प्रस्तुत फॅड या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच आटपाडी तालुक्यातील विविध भागात व स्थानिक कलाकारांना सोबत घेवुन करण्यात आले. प्रितम व प्रविण यांची कथा, पटकथा व लेखन आहे. आटपाडीचे संताजी देशमुख यांनी प्रितम व प्रविण यांच्यासह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तर कॉस्युम डिझायनर म्हणून प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांनी काम केले आहे. शिवाय गणेश देठे, मास्टर दिपक, प्रमुख कलाकार म्हणून प्रेम देशमुख, दिक्षा, मिलींद व वंदना नाईकनवरे, शैलेश, अक्षय, अक्षदा सुतार या कलाकारांनीही यात भुमिका केल्या आहेत.

मुलांचे बालपणातील ओढय़ात मासे पकडणे, पाण्यात खेळणे, चिखलांपासून विविध प्राणी बनविणे, कागदी खोक्यांपासून इमारती-घरे बनविणे, झाडावर सूर पारंब्या खेळणे, लपाछपीचा खेळ, विविध नकला यासह अन्य खेळांना केंद्रबिंदु मानुन फॅड या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली आहे. आधुनिकतेचा आधार घेताना मानवी संवेदना आणि भावनांना मुरड घालुन यंत्रवत बनलेल्या मुलांचे बालपण खुलण्यासाठी अशाच पारंपारिक आणि डोक्यात विविध पध्दतीचे असणारे फॅड या चित्रपटाव्दारे प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लहान मुलांच्या डोक्यात सातत्याने वेगवेगळे फॅड असतात. त्यांच्याकडे जिज्ञासुवृत्ती, चौकसबुध्दी असते. परंतू आजच्या धावपळीच्या युगात अशी मुले मोबाईलमध्ये अडकली आहेत. त्यांचे पारंपारिक खेळही हरविले आहेत. पालक आपल्या मनातील इच्छा-आकांक्षा मुलांवर लादताहेत. त्यामुळे बालपण कोमेजुन जात आहे. शहरी भागातील हे लोण आता ग्रामीण भागातही येत असून मुलांच्या डोक्यातील फॅड जाणुन घेवुन त्याला वाव देण्याचा प्रयत्न पालकांनी करावा, असा संदेश या चित्रपटाव्दारे देण्यात आला आहे.

Related posts: