|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सापळ्य़ात अडकलेल्या बिबटय़ाला वाचविण्याच्या प्रयत्नात वनाधिकारी जखमी

सापळ्य़ात अडकलेल्या बिबटय़ाला वाचविण्याच्या प्रयत्नात वनाधिकारी जखमी 

प्रतिनिधी/ वाळपई

कुळागाराची रानडुकराकडून होणारी नुकसानी रोखण्यासाठी वेळगे – भटवाडी भागात संजय जोशी यांच्या कुळागाराच्या बाजूला लावलेल्या सापळ्य़ात शुक्रवारी रात्री बिटला अडकला. त्याला जीवदान देण्यासाठी आलेल्या बोंडला प्राणी संग्रहालयाचे वनाधिकारी गौतम प्रकाश सालेलकर यांच्या पायावर बिबटय़ाने हल्ला केल्याने ते जखमी झाले. जवळपास तीन तासांच्या मोहिमेनंतर बिबटय़ाला जीवदान देण्यात यश आले. या मोहिमेत वाळपई वनक्षेत्राधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, म्हादई अभयारण्याचे कर्मचारी, बोंडला प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्या बिबटय़ाची रवानगी बोंडला प्राणी संग्रहालयात करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वेळगे भागातील नागरिकांची झोप उडविणाऱया बिबटय़ास जेरबंद करण्यात यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे काजू बागायतीत जाताना बिबटय़ाचा भय राहाणार नाही. यासंबंधिची माहिती अशी की, वेळगे – भटवाडी येथे रानडुक्कराचा वावर वाढले आहे. त्यांच्याकडून कृषी, बागायतींचे मोठय़ा प्रमाणात हानी करण्यात येत असल्याने नियंत्रणासाठी सापळा लावण्यात आला होता. संजय जोशी यांच्या कुळागारातील संरक्षण कुंपणावर सापळा लावण्यात आला होता. अनेक दिवसांपासून या भागात संचार करणारा बिबटा शुक्रवारी रात्री या सापळ्य़ात अडकला. यासंबंधिची माहिती वाळपई वनाधिकारी कार्यालयात देण्यात आली.

बिबटय़ाला जीवदान देण्यासाठी बोंडला प्राणी संग्रहालय, म्हादई अभयारण्य अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची जागा सोयीस्कर नसल्याने व सापळ्य़ात अडकलेला बिबटा आक्रमक बनल्याने कर्मचाऱयांसमोर अडचण निर्माण झाली होती. शेवटी त्याला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. बिबटय़ाला इंजेक्शन देत असताना बोंडला प्राणी संग्रहालयाचे अधिकारी गौतम सालेलकर यांच्या पायावर हल्ला केल्याने ते जखमी झाले. अथक प्रयत्नानंतर बिबटय़ाला इंजेक्शन देण्यात आले. त्याची सापळ्य़ातून सुटका करुन पिंजऱयात घालण्यात आले. बिबटय़ाची खास वाहनाद्वारे बोंडला प्राणी संग्रहालयात करण्यात आली.

बिबटय़ाला जीवदान देण्याच्या मोहिमेत वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी कुलदीप शर्मा, वेरेकर, म्हादई अभयारण्याचे अधिकारी अनिल कूमार, वाळपई वनक्षेत्राधिकारी जेफी डिसोझा, वनाधिकारी रवी शिरोडकर, विठ्ठल बैलुडकर, चंदकांत गुरव, सहदेव नाईक, सत्यवान गावकर, यशवंत गावकर, अभिषेक नाईक, सतीश गावस, पंकज कोपार्डेकर, लता परवार, सुकडो गावडे आदींची उपस्थिती होती.

Related posts: